सिंहस्थ कुंभमेळ्यात धर्मांतराचा घाट

सिंहस्थ कुंभमेळ्यात धर्मांतराचा घाट

‘घरवापसी मोहिमे’मुळे देशात निर्माण झालेला प्रवाद शमला नसतानाच हिंदू धर्मियांच्या प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातदेखील मोठय़ा प्रमाणात धर्मांतर घडवून आणण्याची योजना आखण्यात आली आहे. वेगवेगळ्या अडचणींच्या फे ऱ्यात सापडलेले अल्पसंख्याक व्यक्ती व कुटुंबे हिंदू धर्माकडे आकर्षित होत असल्याचा दावा करीत त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने कुंभमेळ्यात ‘जातकर्म आणि नामकर्म’च्या विधीद्वारे धर्मांतर  घडवून आणण्याची तयारी केली आहे. या पुरोहित संघाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना सिंहस्थासाठी आमंत्रित केले असून, त्यांनीही येण्याचे मान्य केले आहे.
कुंभमेळ्यास जुलैमध्ये सुरुवात होत असून यानिमित्त देशभरातील लाखो साधू-महंत येथे दाखल होत आहेत. देशातील प्रमुख चार पीठांचे शंकराचार्यही या वेळी उपस्थित राहणार आहेत. इतकेच नव्हे, तर विश्व हिंदू परिषदेसह हिंदुत्ववादी संघटनांनी यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. केंद्र व राज्यात भाजपचे सरकार अस्तित्वात आल्यापासून हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचा आक्षेप नोंदवला जात असताना त्याचे प्रतििबब नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यात उमटणार असल्याचे दिसत आहे. यंदाच्या सिंहस्थात प्रथमच धर्मातराला प्राधान्याने स्थान देण्याचे ठरवून त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने याबाबत एक पाऊल टाकण्याचे ठरविले आहे.
विविध दोष वा समस्या निवारणार्थ अल्पसंख्याक व्यक्ती व कुटुंबे त्र्यंबकमध्ये येत असतात. परंतु, ते हिंदू नसल्याने पुरोहितांमार्फत विधीचे सोपस्कार पार पाडले जातात. त्यामुळे ज्यांना स्वहस्ते विधी करावयाचे आहेत, त्यांनी हिंदू धर्म स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाचे अध्यक्ष जयंत शिखरे यांनी सांगितले.
मागील काही वर्षांत हिंदू धर्माकडे आकर्षित होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन कुंभमेळ्यात धर्मातर करू इच्छिणाऱ्यांना हिंदू धर्माची दीक्षा देण्यासाठी पुरोहित संघाने पुढाकार घेतल्याचे शिखरे यांनी नमूद केले. या संघाचे सुमारे ६०० सदस्य आहेत. विश्व हिंदूू परिषद याच काळात संत संमेलनाचे आयोजन करणार आहे. ‘विहिंप’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी हिंदू संमेलने झाली होती. त्याची सांगता येथील संमेलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *