ससूनच्या आवारात डासांची जन्मस्थळे

घरात, सोसायटीच्या आवारात साचलेले पाणी न हटवता त्यावर डेंग्युच्या डासांची पैदास होण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल महापालिकेने एकीकडे नागरिकांवर कडक कारवाई आरंभली असताना ससून रुग्णालयाच्या आवारात आणि मुलांच्या वसतिगृहात पालिकेच्या सर्वेक्षण पथकाला डेंग्यु डासाच्या अळय़ा सापडल्या आहेत. याखेरीज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या नवीन बांधकामाच्या ठिकाणीही डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली आहेत. त्यामुळे रुग्णालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला अनुक्रमे अडीच व दीड हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.    ससून रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी वसतिगृह येथे कचऱ्यातील प्लॅस्टिकचे चहाचे कप, फ्लॉवरपॉट अशा ठिकाणी पावसाचे पाणी साठून डासांची वाढ झालेली सापडली व साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी त्यांना दंड ठोठावण्यात आला. ‘डासांच्या वाढीसंबंधी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या असून औषध फवारणी व धूर फवारणीही केली आहे,’ असे बी.जे.चे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.  पुण्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आणि अजूनही या दोन्ही आजारांचे रुग्ण मोठय़ा प्रमाणावर सापडत आहेत. ऑगस्टमध्ये ५३१ संशयित डेंग्यूरुग्ण सापडले, तर सप्टेंबरमध्ये ही संख्या ८८९ झाली.  तीन दिवसांत ६० डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून चिकुनगुनियाचेही ४४ रुग्ण सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *