सिव्हिलमध्ये गर्भवतीची हेळसांड

जिल्हा शासकीय रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ महिला वैद्यकीय अधिकार्‍याने बाळंतपणासाठी आलेल्या गर्भवती महिलेस दाखल करून न घेता स्वत:च्या खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा अजब सल्ला दिल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. याबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी हतबलता दाखवल्याचे समजते. दरम्यान, या गर्भवती महिलेची अखेर दुसर्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांनी शस्त्रक्रिया करून बाळंतपण केले.
 जिल्हा शासकीय रुग्णालयात शनिवारी (दि.1) मखमलाबाद येथील नम्रता तुपलोंढे ही महिला बाळंतपणासाठी दाखल झाली. मात्र, पहिले बाळंतपण खासगी रुग्णालयात केले. मग दुसरेपण तेथेच करा, असे सांगून संबंधित महिला वैद्यकीय अधिकार्‍याने महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला.
 तसेच संबंधित डॉक्टरने या महिलेस त्यांच्या खासगी रुग्णालयात बाळंतपणासाठी येण्याचा अजब सल्ला दिला. याबाबत तुपलोंढे व त्यांच्या नातलगांनी वरिष्ठांकडे महिला डॉक्टरची तक्रार केली. त्यानुसार निवासी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी महिलेस दाखल करण्याची सूचना केली. मात्र, त्यानंतरही संबंधित डॉक्टरने दाखल करून घेण्यास विरोध केल्यामुळे तुपलोंढे यांना दुसर्‍या कक्षात दाखल करण्यात आले. तिथे दुसर्‍या डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *