बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा भोगत असलेले राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेसाठी शहरात ओबीसी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये ओबीसी संघटनांसोबत भुजबळ समर्थक तसंच अन्य राज्यातील ओबीसी नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होणार असल्याचं संयोजकांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडही सहभागी होणार असल्याचं कळत आहे. मोर्च्याच्या मार्गावर कारंजा येथे फूट प्रिंट पट्टी बसविली असल्याने प्रत्येक मोर्चेकरीची गणना होत आहे
पंचवटीतील तपोवनपासून नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणाऱ्या मोर्चासाठी शहरातील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली असून दुपारच्या सत्रातील काही शाळांना सुटी देण्यात आली आहे. मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली असून जागोजागी भुजबळांचे बॅनर्स, समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.