- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेला धमकीचा संदेश लिहिलेली चिठ्ठी घेऊन सीमेपलीकडून आलेल्या एका कबुतरास सीमा सुरक्षा दलाने रविवारी ‘अटक’ केली.भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून तेथील दहशतवादी तळ उद््ध्वस्त केल्यानंतर मोदींना उद्देशून लिहिलेले व हवाई मार्गाने पाठविलेले असे संदेश पंजाबच्या सीमावर्ती गावांमध्ये येण्याची ही तिसरी घटना आहे. शनिवारी पोलिसांनी असे संदेश लिहिलेले दोन फुगे जप्त केले होते.
सीमेलगतच्या बमिआल सेक्टरमधील सिंबल चौकीजवळ सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना करड्या रंगाचे हे कबुतर मिळाले. त्याच्या पायाला मोदींना उद्देशून लिहिलेला उर्दू संदेश होता. संदेशाचा आशय पाहता हे कबुतर सीमेपलीकडून पाठविण्यात आले असावे, असे दिसते.
शनिवारी पंजाबच्या गुरदासपूर जिल्ह्यात दिनानगरजवळ घेसाल गावात मोदी यांना उद्देशून उर्दूमध्ये संदेश लिहिलेले दोन फुगे गावकऱ्यांना मिळाले. ते पोलिसांनी ताब्यात घेतले होते. पिवळ्या रंगाचे हे दोन फुगे नेमके कुठून पाठविण्यातआले हे लगेच स्पष्ट झाले नाही. घेसाल गावातील एका रहिवाशास त्याच्या घराजवळ हे फुगे हवेतून येऊन जमिनीवर पडलेले आढळले. त्यावर उर्दूमध्ये संदेश लिहिल्याचे पाहून त्याने ते पोलिसांच्या हवाली केले. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल गुरदासपूर आणि पठाणकोट या सीमेवरील जिल्ह्यांचा दौरा करणार असतानाच हे फुगे सापडल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. जुलैमध्येही दिनानगरजवळच्या झंडे चाक गावात पोलिसांना असाच एक फुगा मिळाला होता.
पठाणकोट आणि दिनानगर या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे लष्करी तळावर व पोलीस ठाण्यावर पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्याच परिसरात असे फुगे व कबुतर मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
कबुतराने आणलेला संदेश
‘मोदीजी, १९७१मध्ये (भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी) होतो तसेच आजही आम्ही आहोत या भ्रमात राहू नका. आता भारताविरुद्ध लढायला आमचा बच्चाबच्चाही सज्ज आहे.’
फुग्यांवर चिकटविलेले संदेश
१. ‘मोदीजी, अयुबी की तलवारें अभी भी हमारे पास है. इस्लाम झिंदाबाद’
२. पाकिस्तानचा नकाशा व ‘आय लव्ह पाकिस्तान’
गुजरातच्या किनाऱ्यावर पकडली पाकिस्तानी बोट
भारतीय तटरक्षक दलाने रविवारी गुजरातच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी बोट पकडली. यात ९ जण होते. तटरक्षक दलाने सांगितले, गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यालगत सकाळी सव्वादहाला ही बोट पकडली. हे पाकचे मच्छिमार असल्याचे दिसून येत आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरात केलेल्या कारवाईनंतर सुरक्षा एजन्सी अधिक सतर्क आहेत. पोरबंदर येथे या ९ जणांची चौकशी होणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.