पाकिस्तानला घरातच ठेचले

दसर्‍याआधीच सीमोल्लंघन करीत उरी लष्करी तळावरील दहशतवादी हल्ल्याचा बदला अवघ्या दहा दिवसांत भारताने घेतला. बुधवारी मध्यरात्री भारतीय जवानांनी व्याप्त काश्मिरात सुमारे तीन किलोमीटर आत घुसून पाक लष्कराच्या आश्रयाखाली असलेले दहशतवाद्यांचे सात तळ उद्ध्वस्त करीत 40 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत पाकिस्तानचे काही जवानही ठार झाले असून भारतीय जवानांना मात्र साधे खरचटलेलेही नाही. शांतताप्रिय भारत इशारे देण्यापलीकडे काहीही करणार नाही, असा समज करून घेतलेल्या पाकिस्तानची मात्र या ‘सर्जिकल ऑपरेशन’ने झोप उडाली आहे.

पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवरील गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची मोहीम संपत आली असून पाकिस्तानच्या आगळिकीला जोरदार प्रत्युत्तर देण्याची भारताची जय्यत तयारी झाली आहे. या कारवाईमुळे भारतात दहशतवादी घुसवून निष्पाप नागरिक तसेच लष्करी तळांवर हल्ले करीत असलेल्या पाकिस्तानला भारताने जबरदस्त धडा शिकवला असल्याचे मानले जात आहे.

बुधवारी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीन किलोमीटर आतवर शिरून लष्कराच्या विशेष पथकाने दहशतवादी तळांवर हल्ले चढविले. या हल्ल्यात 40 दहशतवादी तसेच पाकचे काही सैनिक ठार झाले असल्याचे लष्करी सूत्रांनी सांगितले.

कारगील युद्धानंतर भारताकडून पाकिस्तानविरोधात करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. मात्र, आमच्या हद्दीत घुसून कारवाई झालेली नाही, असा कांगावा पाकने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *