ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका अवघ्या ६ महिन्यांवर आल्या असून या दृष्टीने काँग्रेसने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बुधवारी ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, नारायण राणे मार्गदर्शन करणार आहेत.
या मेळाव्याच्या निमित्ताने निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार असून नारायण राणे हे ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाचा आक्रमक शब्दांत समाचार घेण्याची शक्यता आहे. गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ५ वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याकडे लक्ष लागले आहे.
अनेक वर्षापासून ठाणे महापालिकेत सत्ता उपभोगणा-या शिवसेना-भाजपाने शहराची अवस्था बकाल केली आहे. नुकताच शहराचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश झाला, तरी त्यात प्रस्तावित केलेली बहुतांशी कामे ही पायाभूतच आहेत. शहरात जी मोठी आणि महत्त्वाची विकासकामे झाली, ती सर्व राज्य आणि केंद्रातील तत्कालीन आघाडी सरकारने दिलेल्या निधीतून झाली आहेत.
शिवसेना-भाजपाने सलग २०-२५ वर्षे सत्ता उपभोगूनही शहरात काहीही विशेष काम केलेले नसल्याची खदखद ठाणेकरांच्या मनात आहे. ती येत्या निवडणुकीत बाहेर येणार, हे नक्की असून सातत्याने विकासासाठी आग्रही राहिलेल्या काँग्रेसला यंदा ठाण्यात मोठी संधी आहे.
त्यामुळे पक्षाने ठाणे महापालिका निवडणुकीची सूत्रे नारायण राणे यांच्यासारख्या आक्रमक आणि मातब्बर नेत्यांकडे सोपवली आहेत. आता नारायण राणे सत्ताधा-यांवर ‘प्रहार’ करून त्यांना कसे ‘सळो की पळो’ करून सोडतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
