पनवेल महापालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार!

पनवेल महानगरपालिका 1 ऑक्टोबरपासून अस्तित्वात येणार आहे. सरकारने यासंदर्भात आज अधिसूचना काढली आहे. त्यामुळे पनवेल नगरपरिषदेचं संपूर्ण क्षेत्र महानगरपालिका क्षेत्रात येणार आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात 29 महसूली गावांचा समावेश करण्यात आला आहे. खारघरचा महापालिकेत जाण्यास विरोध होता. मात्र खारघरचाही महापालिकेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात पनवेल महापालिकेतील राजकारणाच्या हालचालींना वेग येणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार पनवेल आणि परिसरातील 32 गावांचा समावेश करून नवी पनवेल महापालिका स्थापन करण्यात आली आहे. याबाबतच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलं असून सिडकोच्या आग्रहामुळे नवी मुंबई विमानतळ परिसरात विकसित होणाऱ्या नयना क्षेत्रातील 36 गावं मात्र महापालिकेतून वगळण्यात आली आहेत. महापालिका स्थापनेची अंतिम अधिसूचना आज काढण्यात आली.

नवी मुंबई-पनवेल-उरण परिसरातील वाढते नागरीकरण आणि त्याचा पायाभूत सुविधांवर याचा मोठा ताण पडत आहे.  त्यामुळे या भागाचे योग्य नियोजन करण्यासाठी पनवेल नगरपालिकेसह सिडकोच्या हद्दीतील 21 आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) क्षेत्रातील 11 आणि नयना क्षेत्रातील 36 अशा 68 गावांचा समावेश करून रायगड जिल्ह्य़ातील पहिली महापालिका स्थापन करण्याचा निर्णय सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता.

पनवेल महापालिकेतील गावं

तळोजे, पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, तोंढरे, पेंधर, कळंबोली, रोडपाली, खिडूक पाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसूडगाव, बीड, आडीवली, रोहिंजण, धानसर, पीसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे मजकूर, घोट, कोयनावेळे

नयनातील वगळलेली गावे

अदई, आकुर्ली, पालीदेवद, देवद, वीचुंबे, उसर्ली खुर्द, शिल्लोतर, रायचूर, चिपळे, बोनशेत, विहीखर, चिखले, कोन, डेरीवली, पळस्पे, कोळखे, शिवकर, कोर्पोली, केवाले, नेर, हरीग्राम, नितलास, खैराणे खुर्द, कानपोली, वलप, हेदुटने, पालेबुद्रुक, वाकडी, नेवाळी, उमरोली, अंबीवली, मोहो, नांदगाव, कुडावे, वडीवली, तुरमाले, चिरवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *