पंजाबमधील पटियाला जिल्ह्यातील एका गावात 100 वर्षांच्या वृद्धेची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या वृद्धेच्या कुटुंबीयांनी त्यांच्यावर हत्येपूर्वी बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे.
पटियाला जिल्ह्यातील दौब कलान गावात सोमवारी या वृद्धेचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत सापडला. या वृद्धेच्या डोक्यावर वार करण्यात आल्याने दिसून आले आहे.
या वृद्धेच्या नातवाने सांगितले, की आमची आजी दररोज घराबाहेरील अंगणात मोकळ्या जागेत झोपते. सोमवारी सकाळी आम्हाला तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. या प्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिस अधिकारी हरविंदर विर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, खुनाचा गुन्हा दाखल केला असून, शवविच्छेदनानंतर बलात्काराचाही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. प्राथमिक तपासणीनुसार ही हत्या संपत्तीच्या वादातून किंवा ड्रग्जच्या नशेतून केल्याचे दिसत आहे.