गोहत्येच्या संशयातून एका दलित कुटुंबाला बेदम मारहाण झाल्याच्या घटनेनंतर गुजरातमध्ये भाजपा सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना मृत गुरांची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने गुजरातच्या बानसकांथा जिल्ह्यातील करजा गावात एका दलित कुटुंबाला मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्याखाली सहा जणांना अटक केली आहे.
याप्रकरणी नीलेश रनवासीया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,‘दरबार समाजातील दहा जणांच्या गटाने शनिवारी रात्री हा हल्ला केला. यात आपली गरोदर पत्नी संगीताला मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेत संगीता व इतर दोन महिला जबर जखमी झाल्या आहेत.
संगीतावर पालनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून नीलेश आणि इतर किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. दलितांना मारहाण झाल्याची घटना समजताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन सहा जणांना अटक केल्याचे पोलीस अधीक्षक नीरज बडगुजर यांनी सांगितले.
अटक आरोपींत बतवारसिंह चोहान (२६), मकुंसिंह चोहान (२१), योगीसिंह चोहान (२५), बवीरसिंह चोहान (४५), दिलवीरसिंह चोहान (२३) आणि नरेद्रसिंह चोहान (२३) यांचा समावेश आहे. या घटनेनंतर करजा गावात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शांतता आणि एकोपा राखण्यासाठी आम्ही दलित कुटुंबाला सुरक्षा प्रदान केल्याचे बडगुजर यांनी सांगितले.