पाकिस्तान-रशियामध्ये PoK ऐवजी पेशावरमध्ये होणार युद्ध सराव

पाकिस्तान-रशियामध्ये PoK ऐवजी पेशावरमध्ये होणार युद्ध सराव

पाकिस्तान बरोबर दहशतवाद विरोधी युद्ध सराव करण्यासाठी रशियन सैन्याची एक तुकडी पाकिस्तानात दाखल झाली आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर रशियाने पाकिस्तान बरोबरचा युद्ध सराव रद्द केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. पण हा सराव रद्द झालेला नसून, दोन्ही देशांमध्ये युद्ध सराव होणार आहे.
फक्त हा युद्ध सराव पाकिस्तान व्याप्त काश्मीर किंवा अन्य संवेदनशील ठिकाणी होणार नाही असे भारतातील रशियन दूतावासाने पत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे. पेशावरपासून ३४ मैल अंतरावरील चेराट येथे हा युद्ध सराव होणार आहे. पाकिस्तान आणि रशियामध्ये प्रथमच असा युद्ध सराव होत असून, या सरावाल ‘फ्रेन्डशिप २०१६’ असे नाव देण्यात आले आहे.
‘तास’ या रशियन वृत्तसंस्थेने पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट, बाल्टीस्तान या भागात युद्ध सराव होणार असल्याचे वृत्त दिल्यानंतर उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. रशियन दूतावासाने भूमिका स्पष्ट केल्यानंतर ‘तास’नेही आपल्या ऑनलाइन वृत्तामध्ये बदल केला आहे.
गिलगिट, बाल्टीस्तान हा भाग पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावला आहे असे भारत मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या भाषणात पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख केला होता. ‘फ्रेन्डशिप २०१६’ अंतर्गत रशियन आणि पाकिस्तानी सैन्यामध्ये दोन आठवडे युद्ध सराव चालणार आहे.
रशिया हा भारताचा अत्यंत जवळचा मित्र आहे. त्यामुळे रशियाच्या पाकिस्तानसोबतच्या युद्ध सरावावर इतकी चर्चा सुरु आहे. शीतयुद्धाच्या काळात भारत रशियाच्या गोटातील देश तर, पाकिस्तान अमेरिकेच्या गोटातील देश अशी ओळख होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *