लंचपर्यंत न्यूझीलंडच्या 5 बाद 238 धावा

फिरकीचे जाळे तयार करून न्यूझीलंडला त्यामध्ये अडकवण्याची रणनीती तयार करणाऱ्या भारतीय संघाच्या हाती दुसऱ्या दिवशी काहीच ठोस लागले नव्हते. पण, आज (शनिवार) तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात अश्विन व जडेजाने ऩ्यूझीलंडच्या फलंदाजांना फिरकीच्या जाळ्यात अडकविले. लंचपर्यंत न्यूझीलंडच्या 5 बाद 238 धावा झाल्या होत्या.

कर्णधार केन विल्यम्सन आणि टॉम लॅथम यांच्या नाबाद शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटीत दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली होती. आज तिसऱ्या दिवशी टॉम लॅथमला 58 धावांवर पायचीत बाद केले. त्यानंतर पुढच्याच षटकात जडेजाने रॉस टेलरला शून्यावर बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. अश्विनने आपल्या फिरकीची कमाल दाखवत कर्णधार विल्यम्सनला 75 धावांवर त्रिफळाबाद केले. ल्यूक राँची आणि मिशेन सँटनर यांनी 49 धावांची भागिदारी केली. पण, जडेजाने राँचीला 38 धावांवर पायचीत बाद केले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा सँटनर 28 आणि वॅटलिंग 3 धावांवर खेळत होते.
त्यापूर्वी दुसऱ्या दिवशी ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू असलेल्या या भारताच्या 500 व्या कसोटी सामन्यात भारतीयांच्या चेहऱ्यावर हास्य उमटेल, असे काहीच विशेष घडले नाही. सत्र बदलेल आणि खेळपट्टी करामत दाखवायला सुरवात करेल, अशी भाबडी आशाही भारताला साथ देईनाशी झाली आहे. चेंडू अचानक वळण्याचे आणि न्यूझीलंडचे नाबाद राहिलेले फलंदाज चकण्याचे एक-दोन प्रसंग आले; पण त्या वेळीही दैवाची साथ भारतीयांना लाभली नाही. पहिल्या दिवशी तीन सत्रांचा विचार केला तर भारताने 1-3-5 असे फलंदाज गमावले. आज दुसऱ्या दिवशी चहापानानंतर पावसामुळे खेळ होऊ शकला नाही; पण न्यूझीलंडने 47 षटकांच्या खेळात अवघा एकच फलंदाज गमावला.

सुदैवी न्यूझीलंड
विल्यम्सन 39 धावांवर खेळत असताना अश्‍विनचा एक झपकन वळलेला चेंडू त्याच्या हेल्मेटच्या मागील बाजूस लागला आणि हेल्मेटच्या खाली असलेली पट्टी निघाली आणि थेट यष्टींवर पडली; परंतु बेल्स न पडल्याने विल्यम्सन बाद झाला नाही. चार षटकांनंतर जडेजाच्या चेंडूवर लॅथमने मारलेला स्विपचा फटका त्याच्याच बुटाला लागून शॉर्टलेगला असलेल्या राहुलने पकडला; परंतु तांत्रिकदृष्ट्या त्याला नाबाद ठरविण्यात आले. दुसऱ्या सत्रात विल्यम्सन आणि लॅथम यांच्याविरुद्ध अशा प्रकारची आणखी काही अपील भारतीय करीत होते. कधी बॅटला लागून उडालेला चेंडू क्षेत्ररक्षकांच्या पुढे पडत होता, तर कधी बॅटला हलकेच चकवून जात होता; परंतु भारतीयांच्या हाती काहीच लागले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *