सायीच्या दह्याला लाकडाच्या रवीने भरपूर घुसळून वर जे लोणी येते ते खाण्यासाठी आणि औषधासाठी वापरावे. लोणी हे गोड व थंड असल्यामुळे उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना पित्ताच्या रोगांवर गुणकार आहे. हे उत्कृष्ट शक्तिवर्धकही आहे.
पित्त प्रकृती, पित्ताचे वारंवार विकार होणारे, अंगात कडकी (उष्णता) जास्त असणारे, सतत आगीजवळ काम करणारे यांनी रोज सकाळी एक मोठा चमचा लोणी खडीसाखरेबरोबर घ्यावे.
वारंवार ताप वाटणे, भूक मंदावणे, सतत अशक्तपणा, निरुत्साह जाणवणे यांसाठी १ ते २ चमचे लोणी विरघळवून त्यात खडीसाखर आणि मध घालून घ्यावे. या मिश्रणाने कोरडय़ा खोकल्याची ढासही थांबते. हेच मिश्रण ‘जनरल टॉनिक’ म्हणून शाकाहारी व्यक्तींना ‘कार्डलिव्हर ऑइल’ला पर्याय म्हणून उत्कृष्ट गुणकारी आहे.
एक चमचा लोणी आणि एक चमचा मध दररोज सकाळी घ्यावे. उत्कृष्ट बुद्धिवर्धन आहे, यात खडीसाखर घालून घेतल्यास वजन वाढते, धातुपुष्टी येते.
तोंड येणे, रक्ती मूळव्याध, पोटात सतत आग होणे यासाठी लोण्यातून शंखजिऱ्याची पावडर पोटात घ्यावी किंवा तोंडाला आतून लावावी.