सुब्रतो रॉय यांचा पॅरोल रद्द, तुरुंगात परतण्याचे आदेश

सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांना पॅरोल रजा वाढवून देण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. त्यांना देण्यात आलेली रजा तातडीने रद्द करण्यात येत असून, त्यांनी लगेचच दिल्लीतील तिहार तुरुंगात परतावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे सुब्रतो रॉय यांना पुन्हा एकदा झटका बसला आहे.
सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील खंडपीठामध्ये सुब्रतो रॉय यांचा पॅरोल वाढवून देण्याच्या मागणीवर सुनावणी झाली. सहारा समुहाची संपत्ती विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सेबीला परवानगी दिली. त्यावर सुब्रतो रॉय यांचे वकील राजीव धवन यांनी न्यायालयात आक्षेप घेतला. अशा पद्धतीने परवानगी देणे पक्षपातीपणाचे असल्याचा युक्तिवाद त्यांनी न्यायालयात केला. त्याचबरोबर सुब्रतो रॉय यांनी सेबीकडे आणखी ३०० कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यासाठी आणखी वेळ मिळावा, असेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचवेळी सुब्रतो रॉय यांचा पॅरोलही वाढवून मिळावा, अशी मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली.
त्यांच्या या मागणीवर न्यायालयाने तीव्र आक्षेप घेतला. आम्ही काय करायचे हे शिकवू नका…काय करायचे आहे हे आम्हाला चांगले माहिती आहे…तुमच्या अशिलांना पुन्हा तुरुंगात जायला सांगा. पॅरोलचे आदेश तातडीने रद्द करण्यात येत आहेत, असे सरन्यायाधीश ठाकूर यांनी स्पष्ट केले.
आईच्या निधनामुळे यावर्षी मे मध्ये सुब्रतो रॉय यांना पॅरोल मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर सेबीकडे पैसे भरण्याच्या अटींवर त्यांच्या पॅरोलमध्ये सातत्याने वाढ करण्यात आली होती. अखेर शुक्रवारी पॅरोल रजा रद्द करण्यात आली.
सहारा प्रमुख सुब्रतो रॉय यांना ४ मे २०१४ रोजी अटक करण्यात आली होती. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ते अडचणीत आले होते. रॉय यांनी गुंतवणूकदारांचे १७, ५०० कोटी रुपये १५ टक्के व्याजासह परत करावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशांचे रॉय यांनी पालन केले नाही आणि शेवटी त्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. सुमारे दोन वर्ष तुरुंगाची हवा खाल्ल्यानंतर या वर्षी मेमध्ये रॉय यांना दोन महिन्यांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *