गणेशोत्सवाचे मंडप उभारण्यासाठी रस्त्यांत तसेच सार्वजनिक ठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे उत्सवानंतर तातडीने बुजवणे अपेक्षित असताना शहरातील अनेक भागांत अजूनही मंडपांसाठीचे खड्डे दिसून येत आहेत. याबाबत पालिकेने कडक भूमिका घेतली असली तरी गेल्या आठवडाभरापासून पडणाऱ्या पावसाचे कारण पुढे करत मंडळांनी खड्डे बुजवण्यास असमर्थता दर्शवली आहे. मात्र, यामुळे वाहतुकीला फटका बसत असून पावसाचा जोर कायम राहिल्यास हे खड्डे अधिक रुंदावण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
मंडपांसाठी बेजबाबदार आणि बेशिस्तपणे रस्ते खोदणाऱ्या मंडळांना आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास कुचराई करणाऱ्या महापालिकेला उच्च न्यायालयाच्या दट्टय़ानंतर का होईना कठोर भूमिका घ्यावी लागत आहे. त्यामुळे गेल्या वर्षी खड्डे न बुजविणाऱ्या मंडळांना दंड ठोठावण्याची वा यंदाच्या वर्षी परवानगी नाकारण्याची भूमिका पालिकेने घेतली होती. तसेच, गणेशोत्सवात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मुंबईभर फिरून मंडळांनी खोदलेल्या खड्डय़ांचा आढावा घेतला होता. त्यामुळे विसर्जनानंतर मंडळांनी मंडप उतरविल्यानंतर पदपथ वाहतुकीसाठी खुला करून देण्याबरोबरच मंडपासाठी खणलेले खड्डे बुजविणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या गुरुवारी गणेश विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच मुंबईत पावसाचे धारानृत्य सुरू झाले. पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जाऊ नये म्हणून गणेशोत्सव मंडळांनी रविवापर्यंत मंडप उतरवून रस्ते, पदपथ मोकळे केले. मात्र, आता संततधार पावसामुळे खड्डे बुजवता येत नसल्याचे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. मात्र, पावसाचा जोर कायम राहिल्यास हे खड्डे विस्तारण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
पाऊस थांबल्यानंतर कामे युद्धपातळीवर
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभाग कार्यालयांतील अभियंत्यांना मंडपांसाठी खोदलेल्या खड्डय़ांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र पाऊस थांबत नसल्यामुळे अभियंत्यांना पाहण़ी करता आलेली नाही. तसेच रस्त्यांवरही मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे तेही बुजविण्यात अडथळा येत आहे. पाऊस थांबल्यानंतर ही कामे युद्धपातळीवर हाती घेण्यात येतील, असे विभाग कार्यालयांतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रत्येक खड्डय़ाला दोन हजार रुपये दंड
मंडपांसाठी खोदलेल्या खड्डय़ांच्या पाहणीचे काम पूर्ण झाल्यानंतर ते न बुजविणाऱ्या मंडळांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. एका खड्डय़ासाठी मंडळांकडून दोन हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मंडपासाठी मोठय़ा प्रमाणावर खड्डे खोदणाऱ्या मंडळांनी ते बुजविण्यासाठी धडपड सुरू केली आहे.