निदान ‘आतले’ अनुभव घेण्यासाठी तर भुजबळांना भेटा, शिवसेनेचा राष्ट्रवादीला टोला

छगन भुजबळ यांना जे. जे. रूग्णालयात जाऊन भेटण्याची जी हिंमत महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दाखवली ती कौतुकास्पद असून ही हिंमत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवण्याची गरज होती, असे खडे बोल शिवसेनेने राष्ट्रवादीला सुनावले आहेत. ज्या राष्ट्रवादीसाठी भुजबळांनी ही सर्व अघोरी कृत्ये केली तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज भुजबळांना दूर सारत आहे. आज भुजबळ ‘जात्या’त असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक पुढारी ‘सुपा’त आहेत व निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते.
भुजबळ हे आपल्या कर्माची फळे भोगत असले तरी राष्ट्रवादीने माणुसकी जपणे गरजेचे होते, असा सल्ला देत मुंडे-भुजबळ भेटीचा राजकीय फायदा घेणाऱ्यांनाही शिवसेनेने सुनावले आहे. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंकजा या भुजबळांना भेटल्या काय अशी शंका उपस्थित करणाऱ्यांवर ताशेरे ओढले. खंगलेल्या, थकलेल्या काकांना पंकजा भेटायला गेल्या. पटेल, पवार, तटकरे यांनी त्यांच्याकडून काही शिकावे, असे म्हटले.
भुजबळ हे आपले राजकीय विरोधक असले तरी त्यांच्या सध्याच्या अवस्थेबद्दल सहानुभूती आहे. भुजबळांनी अघोरी कृत्य केले. त्याची ते फळे भोगत आहेत. ज्या राष्ट्रवादीसाठी त्यांनी हे सर्व केले. त्या राष्ट्रवादीने मात्र त्यांनी ‘कलटी’ दिली असा उपहासात्मक टोलाही लगावला.

छगन भुजबळ-आसारामबापूंची तुलना

सध्या छगन भुजबळ व आसारामबापू यांची तुलना करत न्याययंत्रणा कायद्याने चालते की कुणाच्या इशाऱ्यावर चालते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. लैंगिक शोषणाचा व बलात्काराचा आरोप असणारा आमदार आठवड्याभरातच जामिनावर सुटतो. पण आसारामबापू आणि भुजबळ हे अनेक दिवसांपासून तुरूंगातच आहेत. सुरेश जैन यांना चार वर्षे तुरूंगात सडवण्यात आले. न्यायदेवता कुणाच्या मर्जीने व दबावाने राजकारण करते काय अशी शंका व्यक्त केली.
भुजबळांच्या चांगल्या दिवसांत सगळेच ‘साहेब’, ‘भुजबळसाहेब’ म्हणून उदो उदो करत होते. भुजबळ फार्मवर पाहुणचाराच्या पंगती झडत होत्या, पण आज थकलेल्या व खंगलेल्या भुजबळांना कुणी भेटायला गेले नाही . निदान ‘आत’ले अनुभव आणि व्यवस्थेविषयी जाणून घेण्यासाठी तरी या मंडळींनी भुजबळांना भेटायलाच हवे होते. पंकजा मुंडे भेटल्या हे त्यांचे धाडस. गोपीनाथ मुंडे हयात असते तर त्यांनीही अशीच हिंमत दाखवली असती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *