भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून (२२ सप्टेंबर) कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरुवात होत आहे. भारताची ही ५००वी कसोटी आहे. ऐतिहासिक कसोटी आणि मायदेशातील नव्या हंगामाची सुरुवात पाहता विराट कोहली आणि सहकारी ऐतिहासिक विजयासाठी उत्सुक आहेत.
१९३२ ते २०१६ अशा ८४ वर्षाच्या कालावधीत विक्रमी ५०० कसोटी सामने खेळणा-या भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. जगातील एक यशस्वी कसोटी संघ असलेल्या भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. सद्यस्थितीतही भारत आयसीसी रँकिंगमध्ये दुस-या स्थानी आहे.
अव्वल रँकिंगवर असलेल्या पाकिस्तान आणि भारतात केवळ एका रेटिंग गुणाचा फरक आहे. वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये हरवणा-या भारताने चांगला फॉर्म राखला आहे. मायदेशातील मागील दहा सामन्यांपैकी नऊ सामने जिंकलेत. एक कसोटी अनिर्णीत राहिली. ही कामगिरी पाहता घरच्या मैदानावर यजमानांचे पारडे जड आहे. न्यूझीलंडला दक्षिण आफ्रिका दौ-यात पराभूत व्हावे लागले तरी केन विल्यमसन आणि कंपनीला कमी लेखून चालणार नाही. त्यांच्या अनेक क्रिकेटपटूंना भारतात खेळण्याचा अनुभव आहे.
भारताचा संघ सहा फलंदाज आणि पाच गोलंदाजांसह खेळण्याची शक्यता आहे. मात्र गोलंदाजीचे ‘काँबिनेशन’ कसे असेल, याचा अंदाज बांधता येत नाही. तीन मध्यमगती आणि दोन फिरकी असे पाच गोलंदाज खेळवण्यासाठी कर्णधार कोहलीसह प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा भर असेल. मात्र चिकनगुनियामुळे अनुभवी मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मा पहिल्या कसोटीत खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव अंतिम संघात स्थान मिळवू शकतात.
मात्र तीन मध्यमगती गोलंदाज खेळवायचे की त्यातील एक कमी करून आणखी एक फलंदाज खेळवण्याचा पर्यायही आहे. ऑफस्पिनर आर. अश्विनसह लेगस्पिनर अमित मिश्रा या दोन हुकमी फिरकीपटूंसह डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजा संघात असेल. अर्थात त्याचा समावेश अष्टपैलू म्हणून असतो.
यजमानांना फलंदाजीची चिंता नाही. मुरली विजय आणि रोहित शर्मा फॉर्मात नसले तरी शिखर धवन, लोकेश राहुल, कर्णधार कोहली आणि चेतेश्वर पुजारामुळे आघाडी फळी मजबूत आहे. मधल्या फळीत अजिंक्य रहाणेसह यष्टिरक्षक, फलंदाज वृद्धिमन साहा, अष्टपैलू अश्विन आणि जडेजा आहेत.
पाहुण्या संघाला प्रमुख क्रिकेटपटूंच्या दुखापतींचा फटका बसला आहे. वेगवान गोलंदाज टिम साउदी हा पायाचा घोटा दुखावल्याने कसोटी मालिकेला मुकला आहे. कमरेच्या दुखापतीमुळे अष्टपैलू जेम्स नीशॅम पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. न्यूझीलंडच्या विद्यमान संघात फलंदाज म्हणून रॉस टेलर आणि कर्णधार विल्यमसन सर्वाधिक अनुभवी आहेत. दोघांच्या नावे पन्नासहून अधिक कसोटी सामने आहेत.
भारताविरुद्ध प्रत्येकी पाच सामने दोघेही खेळलेत. मात्र अनुभवी मार्टिन गप्टिल, ल्युक राँचीकडून त्यांना मोठी अपेक्षा आहे. साउदीच्या अनुपस्थितीत ट्रेंट बोल्ट, नील वॅग्नरवर वेगवान मा-याची भिस्त आहे. मात्र भारतातील फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ा पाहता ईश सोढी, डावखुरा मिचेल सँटनर या स्पिनर्सवर न्यूझीलंडची गोलंदाजीची सर्वाधिक मदार आहे.