कासवांची तस्करी करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक

कासवांची तस्करी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्याला वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाच्या (डब्ल्यूसीसीबी) पश्चिम विभागीय शाखेमार्फत सोमवारी दुपारी ऐरोली येथे रंगेहाथ पकडण्यात आले. डोंबिवलीतील या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव मयूरेश शिर्के असे असून त्याच्याकडून ‘स्टार’ जातीच्या कासवांची २४ पिले हस्तगत करण्यात आली.

ऐरोली येथील सेक्टर-१ भागातील गोपीनाथ पारसिक जनता सहकारी बँकेजवळ कासवांची विक्री करण्यास एक इसम येणार असल्याची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाला मिळाली होती. या विभागाचे उप-संचालक एम. एम. मारंको यांच्यासोबत आलेल्या पथकाने सापळा रचून त्या इसमाला पकडले. त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये ‘स्टार’ जातीच्या कासवांची २४ पिले आढळून आली. पुढील चौकशीत त्याचे नाव मयूरेश शिर्के असून तो डोंबिवलीतील शास्त्री नगर येथे राहणारा रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. हा शिर्के भाजपच्या विद्यार्थी आघाडीचा कल्याण-डोंबिवली जिल्हा सरचिटणीस असून तो राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा कार्यकर्ता असल्याचे समजते.

शिर्के याच्या फेसबुकवरील खात्यावरही त्याने भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रवींद्र चव्हाण व सांस्कृतिक कार्य व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह उपस्थिती लावल्याची छायाचित्रे टाकली आहेत. त्यामुळे भाजपच्या बुरख्याआडून कासवांची तस्करी करणाऱ्याचा पर्दाफाश झाल्याची चर्चा शहरात सुरू होती.

‘स्टार’ जातीची कासवे उपद्रवी नसल्याने अनेक जण आपल्या घरात त्यांचे पालन करतात. मात्र, कायद्यान्वये या कासवांच्या पालनाला बंदी असूनदेखील तस्कर यांची १२०० ते १५०० रुपयांना एक याप्रमाणे विक्री करतात. ही बाब चुकीची असल्याचे कारवाई करण्यात आलेल्या पथकात सहभागी झालेले ‘पॉज’ संस्थेचे सुनीश कुंजू यांनी सांगितले. दरम्यान, शिर्के याने या गुन्ह्य़ाची कबुली देत २५ हजार रुपये दंड भरला आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी त्याला बेलापूर येथील न्यायालयात पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितल्याचे वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागाचे मारंको यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *