उत्तर प्रदेशातील अलाहाबादजवळ आज (मंगळवार) सकाळी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार हे लढाऊ विमान कोसळले. विमानातील दोन्ही वैमानिक सुरक्षित आहेत.
हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसातच्या सुमारास हवाई दलातील जॅग्वार या लढाऊ विमानातून दोन वैमानिक नेहमीप्रमाणे सरावासाठी गेले होते. मात्र, अलाहाबादपासून 18 किमी अंतरावर हे विमान कोसळले. विमान दुर्घटनेपूर्वी वैमानिकांनी स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जॅग्वार विमान दुर्घटनाग्रस्त होण्याची या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी मार्चमध्ये हरयानाती कुरक्षेत्र येथे विमान कोसळले होते. त्यावेळीही वैमानिकांनी सुखरूप सुटका करून घेतली होती. जॅग्वार हे फ्रेंच बनावटीचे लढाऊ विमान आहे.

