पुरुषाने एकाच वेळी दोन महिलांना लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचे प्रकार नेहमीच घडतात. मात्र बेंगळुरुमध्ये एका महिलेने एक – दोन नव्हे तर तब्बल सात पुरुषांशी लग्न करुन त्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातल्या एकाही पुरुषाला पत्नीचा हा प्रताप माहित नव्हता. एकाला संशय आला आणि त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर त्या महिलेचे बिंग फुटले आहे.
बेंगळुरुत राहणा-या इम्रान नामक तरुणाने बेंगळुरु पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. इम्रानने त्याची ३८ वर्षांची पत्नी यास्मीनविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. याात इम्रानने पत्नी ने फसवणूक केल्याचा तसेच पैशांसाठी मारहाणीचा आरोप केल्याचे वृत्त इंग्रजी संकेतस्थळांनी दिले आहे. इम्रानने यास्मीन बानू या महिलेशी लग्न केले होते. लग्नानंतर यास्मीनने पैशांचा तगादा लावला आणि यासाठी त्याला माराहणदेखील केली. शेवटी त्याला हा प्रकार असह्य झाला आणि त्याने थेट पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी इम्रानच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. मात्र यास्मीन पसार झाल्याने सध्या तिचा शोध घेतला जात आहे. इम्रानच्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे याचा तपास केला जात आहे. इम्रानच्या तक्रारीनंतर शोएब आणि अफझल हे दोन तरुणही पुढे आले असून यास्मीनने लग्न करुन आम्हाला देखील फसवल्याचा आरोप या दोघांनी केला आहे. यातील अफझल हा रिअल इस्टेट एजंट असूनत्यालादेखील यास्मीनने पैशांसाठी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. यास्मीन ही सराईत भामटी असल्याचा दावा या तक्रारदारांनी केला आहे.