महापालिका रुग्णालयात मोफत अवयव प्रत्यारोपण

अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत महापालिकेला मिळत नसल्याने रुग्णांना योग्य उपचारही मिळत नाही. त्यामुळे सरकारपुढे भिकेसाठी हात पुढे न करता अवयव प्रत्यारोपणासाठी महापालिकेने आर्थिक निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्याचे ठरवले आहे.

अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सार्वजनिक आरोग्य समितीला हे आश्वासन दिले. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणासाठी दोन ते अडीच लाखांचा येणारा भार आता महापालिका उचलणार आहे. त्यामुळे गरीब रुग्णांना मोफत उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिका रुग्णालयांतील अनेक प्रश्नांबाबत वारंवार सदस्यांकडून तक्रारी येत असल्याने सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम यांनी अतिरिक्त आयुक्त आय. ए. कुंदन यांनी सभेला उपस्थित राहण्याची सूचना केली होती.

त्यानुसार कुंदन यांनी सभेला उपस्थित राहून रुग्णालयांमधील समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी अवयवदानासंदर्भात जनजागृती करताना अवयव प्रत्यारोपणसाठीचा खर्च महापालिकेने उचलावा, अशी सूचना माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी मांडली होती. यासाठी राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होणे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात तो निधी उपलब्ध होण्यास बराच अवधी जाणार आहे.

यासाठी महापालिकेने निधी सांकेतांक तयार करून निधीची तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन कुंदन यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य समितीचे प्रशांत कदम यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. शुभा राऊळ, शीतल म्हात्रे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यावेळी उपस्थित होते. रुग्ण शय्येवर अखेरची घटका मोजत असलेल्या रुग्णाकडून जर अवयवदान केल्यानंतर एखादा गरीब व गरजू रुग्णाला पैशांची जमवाजमव न झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करता येत नाही.

त्यामुळे अवयव प्रत्यारोपण अन्य रुग्णाला केले जाते. पैशांअभावी गरीब व गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपण होऊ शकत नाही. त्यामुळे महापालिकेने निधी उपलब्ध करून दिल्यास अवयव प्रत्यारोपण मोफत केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *