कोरे अँडरसनचे न्यूझीलंड संघात पुनरागमन

भारताविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने अष्टपैलू कोरे अँडरसनला संघात स्थान दिले आहे. मात्र, या मालिकेत तो फलंदाज म्हणूनच खेळेल, असे ‘न्यूझीलंड क्रिकेट संघटने‘ने आज (सोमवार) जाहीर केले. घोट्याच्या दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतलेला वेगवान गोलंदाज टीम साऊदी याचे एकदिवसीय मालिकेसाठी संघातील स्थान कायम राहिले आहे.

भारताविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आज संघ जाहीर केला. भारतात झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर अँडरसन न्यूझीलंडकडून खेळलेला नाही. पाठीच्या दुखापतीमुळे त्याने झिंबाब्वे आणि दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या एका स्थानिक सराव सामन्यामध्ये अँडरसन मैदानावर उतरला होता; मात्र त्याने गोलंदाजी केली नव्हती.

भारताविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंडला दुखापतींनी सतावले आहे. मिशेल मॅक्‍लनघन, ऍडम मिल्ने हे वेगवान गोलंदाज, फलंदाज कॉलिन मुन्रो आणि अष्टपैलू जॉर्ज वर्कर हे दुखापतींमुळे भारत दौऱ्यातून माघारी परतले आहेत.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना 16 ऑक्‍टोबर रोजी धरमशाला येथे होणार आहे. सध्या ‘आयसीसी‘च्या क्रमवारीत न्यूझीलंड दुसऱ्या, तर भारत तिसऱ्या स्थानी आहे.

न्यूझीलंडचा संघ :
केन विल्यमसन (कर्णधार), कोरे अँडरसन, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, अँटॉन डेव्हचिक, मार्टिन गुप्टील, मॅट हेन्री, टॉम लॅथम, जेस निशॅम, ल्युक रॉंची, मिशेल सॅंटनर, ईश सोधी, टीम साऊदी, रॉस टेलर, बी. जे. वॉटलिंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *