- मुंबईजवळ समुद्रात बुडालेल्या मच्छीमार बोटीवरील १७ पैकी १४ मच्छीमारांना वाचविण्यात शनिवारी सायंकाळी बचाव पथकांना यश आले. या बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी समुद्रात उतरलेले नौदलाचे दोन पाणबुडे (डायव्हर्स) दिसेनासे झाल्याने नौदलाच्या चिंतेत भर पडली होती. अखेर रविवारी सकाळी या दोन्ही पाणबुड्यांचा शोध लागला आणि त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, खवळलेला समुद्र, मुसळधार पाऊस, अंधार आणि खराब हवामानाशी या जवानांनी रात्रभर यशस्वी झुंज दिली.मुंबईपासून ३० सागरी मैल अंतरावर शनिवारी सकाळी दत्त साई ही बोट खराब हवामानामुळे बुडाली. याच परिसरात असलेल्या एमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दल आणि ओएनजीसीच्या पथकांनी संयुक्त मोहीम राबवली. शोधकार्यादरम्यान शनिवारी सायंकाळी नौदलाच्या आयएनएस त्रिशूलवरील जवानांना समुद्रात एक मच्छीमार वाहून जात असल्याचे आढळले. या मच्छीमाराला वाचविण्यासाठी आयएनएस त्रिशूलवरील बिपीन दहल आणि घनश्याम पाटीदार हे दोन पाणबुडे (डायव्हर्स) समुद्रात उतरले.
अपघात आणि खराब हवामानामुळे भेदरलेला मच्छीमार बचावासाठी आलेल्या जवानांपर्यंत पोहचू शकला नाही. अवघ्या तीन मीटरवर असूनही खवळलेल्या समुद्रामुळे मच्छीमारापर्यंत पोहचणे शक्य होत नव्हते. या प्रयत्नात मच्छीमारासह पाणबुडेदेखील समुद्रात दिसेनासे झाले.
त्यामुळे बेपत्ता मच्छीमारांसह पाणबुड्यांच्या शोधासाठी दहा बोटी आणि चार हेलिकॉप्टर्सच्या साहाय्याने बचाव पथकांनी जोरदार मोहीम हाती घेतली. रविवारी सकाळी ६च्या सुमारास शोधपथकांना दोन्ही पाणबुड्यांचा शोध घेण्यात यश आले. प्रतिकूल परिस्थितीतही या दोघा जवानांनी समुद्रात संपूर्ण रात्र काढली.
तब्बल बारा तासांहून अधिक काळ या जवानांनी समुद्राशी यशस्वी झुंज तर दिलीच; शिवाय या कालावधीत एकमेकांच्या सहकार्याने बेपत्ता मच्छीमारांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या पाणबुड्यांना मुंबई नौदलाच्या आयएनएस अश्विनी रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, त्यांची प्रकृती उत्तम आहे.
नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी या जवानांची रुग्णालयात भेट घेतली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही देशबांधवांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून नेटाने प्रयत्न करून या जवानांनी नौदलाच्या उच्च परंपरेचा वारसा पुढे चालविल्याबद्दल लुथरा यांनी जवानांचे कौतुक केल्याचे जनसंपर्क अधिकारी कॅप्टन राहुल सिन्हा यांनी सांगितले.
>तीन जण बेपत्ता
एमव्ही डीपेंडेबल या बोटीने तातडीने घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त मच्छीमार बोटीवरील १४ मच्छीमारांची सुटका केली. तर, बेपत्ता मच्छीमारांच्या सुटकेसाठी नौदल, तटरक्षक दलाचे प्रयत्न सुरू आहेत.