कोकणातील पहिल्या महिला ढोलपथकाला प्रचंड मागणी

महिला काहीही करू शकतात हे यापूर्वीच त्यांनी सिद्ध झाले आहे, उलट महिलांना आता आपले कर्तृत्व सिद्ध करायला नवनवी क्षितिजे अपुरी पडू लागली आहेत. म्हणूनच पुण्याच्या धर्तीवर कोकणातही महिला ढोल पथक असावे, असा विचार कणकवली येथील साहसी महिलांच्या मनात आला.

अर्थात हा बदल पुरुषी संस्कृतीला न झेपणारा होता, त्यामुळे विरोधही झाला. त्याला मोडीत काढत या महिलांनी कोकणातील पहिले महिला ढोल पथक ‘कनक संस्कृती’ या नावाने स्थापन केले आणि श्री रत्नागिरीच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याचा मान सुद्धा त्यांना मिळाला.

कणकवली येथील या ‘कनक संस्कृती’ ढोल ताशे पथकामध्ये डॉक्टर, इंजिनीअर, भाजी विक्रेत्या, घरकाम करणा-या अशा एकूण ३० महिलांचा समावेश आहे. महाराष्ट्राची संस्कृती टिकावी व महिलांनी कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये, या हेतूने राजश्री रावराणे, गीता कामत, अमृता गावकर, सृष्टी शिर्के, गौरी कामत या महिलांनी पुढाकार घेऊन जानेवारी २०१६ ला या पथकाची स्थापना केली. सुरुवातीला या पथकाला खूप विरोधही झाला. अनेकांनी तक्रारी केल्या.

अखेर तेथील मराठा मंडळाने सरावासाठी हॉल देऊन या महिलांचा उत्साह वाढवला. संगीत शिक्षक श्रीधर पाचंगे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिला ढोल वादनात पारंगत झाल्या आहेत. आता या महिलांची टिकाकारांनीही स्तुती करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या ८ महिन्यांत या पथकाने आपली चुणूक अनेक ठिकाणी दाखवली आहे. संपूर्ण कोकणात या ढोल पथकाला प्रचंड मागणी आहे.

या महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध करताना केवळ पुणे-मुंबईतीलच नव्हे तर कोकणातील महिलाही कर्तबगार असून पुरुषापेक्षा काकणभर पुढेच असल्याचे या कनक संस्कृती ढोल पथकाच्या रूपाने दाखवून दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *