मुंबईत ‘स्पेशल 26’ स्टाईल चोरी, आयकर अधिकारी बनून 1.65 कोटींची लूट

मुंबईत ‘स्पेशल 26’ स्टाईल चोरी, आयकर अधिकारी बनून 1.65 कोटींची लूट

मुंबईत सध्या ‘स्पेशल 26’ गँगची दहशत वाढली आहे. कोण, कुठे आणि कोणत्या वेशात इन्कम टॅक्स ऑफिसर बनून घरात दाखल होतील आणि गंडा घालतील हे कोणीच सांगू शकत नाही. मुंबई पोलिसांनी अशाच ‘स्पेशल 26’ नावाच्या गँगच्या आठ जणांना अटक केली आहे. या गँगने अक्षय कुमारच्या ‘स्पेशल 26’ या सिनेमाच्या स्टाईलने 1 कोटी 65 लाखांची लूट केली.

मुंबईतील कांदिवली परिसरातील एका गँगने खोटे इन्कम टॅक्स अधिकारी बनून कोट्यवधींची लूट केली. गँगच्या प्रमुखाने सुरुवातीला काही लोकांची ‘स्पेशल 26’साठी भरती केली.

कशी केली चोरी?

या गँगने सिनेमाच्या हूबेहूब अंदाजात कोट्यवधींची चोरी केली. या गँगमध्ये भरती केलेल्या नऊ जणांना ट्रेनिंग देण्यात आलं. चोरीच्या जागेची रेकी केली. ज्या पद्धतीने सिनेमात अक्षय कुमार बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्याचा आयकार्ड दाखवतो तसंच आयकार्ड त्यांनी बनवलं.
2 जून रोजी मुंबईच्या कांदिवली परिसरात राहणाऱ्या जयंतीबाई सरवैया यांच्या घरात आठ जण इन्कम टॅक्स ऑफिसर बनून घुसले. घराची झाडाझडती घेण्याच्या नावाखाली लॉकर उघडायला सांगितलं. परंतु घरात असलेल्या महिलेने मनाई केली. त्यानंतर बनावट अधिकाऱ्यांनी लॉकर तोडण्याची धमकी देऊन कपाट उघडलं. या कपाटात असलेल्या दोन बॅग्जमध्ये कोट्यवधींची रोकड आणि लाखोंचे दागिने तसंच महागडी घड्याळं होती. त्यानंतर आरोपींनी हायर केलेल्या कारमध्ये महिलेला बॅगसह बसवून नेलं आणि रस्त्याच्या मध्ये महिलेला उतरवून इन्कम टॅक्स कार्यालयात पैसे घ्यायला ये असं सांगून तिथून पळ काढला.

यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे महिला पोलिस स्टेशनमध्ये या प्रकाराची तक्रार करण्यासाठी गेली असता असं कळलं की, जयंतीबाई सरवैया यांना बिल्डर रामजी भाईने हे पैसे ठेवण्यासाठी दिले होते. तक्रारीत 25 लाखांची रोकड आणि दागिने लुटल्याचं म्हटलं होतं. पण तपास केल्यानंतर पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली.

नातेवाईकानेच चोरीचा प्लॅन आखला

तपासात असं समोर आलं की, जयंतीबाई सरवैया यांचा नातेवाईक जगदीश मेवाड यानेच चोरीचा प्लॅन आखला होता. ज्यासाठी मुंबईच्या धारावी परिसरातील भरत वेगडा याला संपर्क करुन आठ लोकांची भाड्याने नेमणूक केली होती. एकूण नऊ लोकांचा या ‘स्पेशल 26’ गँगमध्ये समावेश होता.

या आठ आरोपींनी एक कोटी 65 लाख रुपयांची चोरी केली, ज्यात ब्रॅण्डेड घड्याळ आणि दागिन्यांचा समावेश आहे. पकडलेल्या आरोपींची नावं कादर शेख, पंकज चव्हाण, युनुस शेख, परेश गोस्वामी, जगदीश मेवाड, भारत बिगाड, बालकृष्ण अशी असून एक अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही. पोलिसांनी एक कोटी 21 लाखांचा ऐवज जप्त केला.

पण आता पीडित जयंतीबाई सरवैया आणि बिल्डर रामजी भाई पोलिसांच्या निशाण्यावर आहेत. एक कोटी 65 लाखांची चोरी झाली असताना जयंतीबाईंनी फक्त 25 लाखांची चोरी झाल्याची तक्रार का नोंदवली?, एवढे पैसे कुठून आले आणि बिल्डरने सरवैया यांच्याकडे हे पैसे का ठेवले?  याचा तपास सुरु आहे. पोलिस आता बिल्डरची चौकशी करणार आहे. शिवाय अंमलबजावणी संचलनालयालाही याबाबतची माहिती देणार आहे.

परंतु अक्षय कुमार, अनुपम खेर, मनोज वाजपेयी, जिमी शेरगील यांसारख्या मुरलेल्या अभिनेत्यांनी कधीही स्वप्नात विचार केला नसेल की, त्यांच्या ‘स्पेशल 26’ या सिनेमावरुन कोणी कधीही चोरी करु शकेल. ज्या ऑपेरा हाऊस परिसरात चोरीचा सीन दाखवण्यात आला त्यामधून प्रेरणा घेत आठ तरुणांनी तशीच चोरी खऱ्या आयुष्यात करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा प्रयत्न फसला आणि ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *