चेंबूर येथे मुलीवर पित्याकडून बलात्कार

चेंबूर येथे राहणार्‍या एका तेरा वर्षांच्या मुलीवर तिच्याच पित्याने चाकूचा धाक दाखवून पंधरा दिवसांत तीन वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरुन 34 वर्षांच्या आरोपी पित्याला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी देणे आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तेरा वर्षांची ही पीडित मुलगी तिच्या आई-वडिलासोबत चेंबूर परिसरात राहते. तिचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. पंधरा दिवसांपूर्वी घरात कोणीही नव्हते. यावेळी घरात असलेल्या पित्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

या प्रकाराची तिने कुठेही वाच्यता करु नये असे सांगून तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती.  त्याच्याच फायदा घेत या नराधम पित्याने तिच्यावर दोन वेळा पुन्हा बलात्कार केला होता.

पित्याकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ असहय झाल्याने अखेर या मुलीने ही माहिती तिच्या आईला सांगितली. आईने मुलीला ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात आणले आणि तिथे पतीविरुद्ध तक्रार केली होती.

याप्रकरणी आरोपी पित्याविरुद्ध बलात्कारासह जीवे मारण्याची धमकी आणि पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होताच सोमवारी आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला येथील विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *