नांदेडमध्ये स्वयंघोषित संस्कृतीरक्षक टोळक्याची युवक युवतीला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

लातूरनंतर नांदेडमध्येही संस्कृती रक्षणाच्या नावाने गुंडगिरी झाल्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. नांदेडमध्ये तरुण तरुणीला बारा जणांच्या टोळक्याने दमदाटी करत मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या टोळक्याने संबंधित तरुणीचा विनयभंग करत घटनेचं चित्रकरण करुन सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला आहे.

विनयभंग आणि मारहाणप्रकरणी बारा जणांपैकी चौघा जणांना अटक करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर इथ एका शांत ठिकाणी संबंधित युवक आणि युवती बसले होते. त्याचवेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेले 12 तरुणांचे एक टोळके त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी या टोळक्यातील काही जणांनी युवकाला प्रचंड मारहाण केली, तर काहींनी संबंधित युवतीशी असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला.

आरोपींनी या सर्व घटनेचं चित्रीकरण एका मोबाईलमध्ये केलं. संबंधित युवक युवती कसेबसे या टोळक्याच्या तावडीतून सुटले. बदनामीच्या आणि आरोपींच्या भीतीने घडलेला प्रकार त्यांनी कुणालाच सांगितला नाही, मात्र सोमवारी संध्याकाळी घडलेल्या प्रकाराचे चित्रीकरण आरोपींनी सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारे व्हायरल केले. त्यानंतर त्या युवकाने पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत यातील 4 मुख्य आरोपींना अटक केली आहे. उर्वरित 8 आरोपींचा शोध सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *