भावाच्या लग्नासाठी केली फसवणूक

मोठ्या भावाच्या लग्नासाठी फसवणुकीचा धंदा थाटलेल्या तरुणाचा पर्दाफाश करण्यास आझाद मैदान पोलिसांना यश आले आहे. सालेम शेख (२३) असे प्रतापी तरुणाचे नाव असून, त्याने व्हिसा बनवून देण्याच्या नावाखाली लाखो रुपयांवर डल्ला मारला.

गेल्या दीड वर्षापासून सालेम ट्रॅव्हल एजन्सीमध्ये व्हिसा विभागाचे कामकाज सांभाळत होता, तसेच परदेशात कामासाठी जाणाऱ्या ग्राहकांना व्हिसा मिळवून देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. व्हिसा बनवून देण्यासाठी तो ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी आकारत असे. मात्र, ही रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करत असे. ६५०० रुपयांची आगाऊ रक्कम दिली असतानाही व्हिसाचे काम झाले नाही, म्हणून पैसे दिले नसल्याची माहिती संबंधित ग्राहकाकडून मिळताच, कंपनीचे अधिकारीही चक्रावले. कारण त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली नव्हती. अखेर २ सप्टेंबर रोजी ही बाब कंपनीच्या लक्षात आली. या प्रकारानंतर कंपनीने अंतर्गत चौकशी सुरू केली. तेव्हा जवळपास २० ग्राहकांसोबत असा प्रकार घडल्याचे समोर आले. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासामध्ये सालेमचा प्रताप उघडकीस येताच, पोलिसांनी त्याला पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *