शहीद महाडिक यांच्या पत्नी “लेफ्टनंट’पदी रुजू

सीमेवर लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती याही आता सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होत आहेत. “लेफ्टनंट‘ या पदावर त्यांची निवड झाली असून, चेन्नई येथील “ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी‘मध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दहशतवाद्यांशी लढताना सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांना वीरगती प्राप्त झाली. पतीच्या अंत्यसंस्कारावेळीच स्वाती यांनीही पतीप्रमाणे देशसेवा करण्यासाठी लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच केवळ अनुकंपा तत्त्वावर नकोय, तर कठोर चाचण्या पूर्ण करूनच त्यांनी ही इच्छा प्रत्यक्षात फलद्रूप केल्याचे दिसत आहे. चेन्नई येथील संस्थेत त्यांना 49 आठवड्यांचे खडतर सैनिकी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्यांनी पुण्यातील “ऍपेक्‍स करिअर्स‘ या संस्थेत एसएसबी मुलाखतीचे महिनाभर प्रशिक्षण घेतले आहे. मे महिन्यामध्ये त्यांची बंगळूर येथे मुलाखत झाली होती. 1 सप्टेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होऊन स्वाती यांच्यासह त्यांच्यासोबत मुलाखतीची तयारी करत असलेल्या निधी मिश्रा या विधवा महिलेचेही नाव गुणवत्ता यादीत झळकले. त्यामुळे स्वतःच्या निवडीपेक्षाही अधिक आनंद मिश्रा यांच्या निवडीचा झाल्याचे स्वाती यांनी सांगितले. तसेच मुलाखतीचे प्रशिक्षण घेताना तेथील सर्व तरुणींनी खूप मदत केली. मुलाखतीच्या अडथळ्यांची शर्यत पार पाडताना या तरुणींकडून खूप काही शिकण्यास मिळाल्याच्या भावनाही स्वाती यांनी व्यक्त केल्या.

अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतर स्वाती यांनी लेफ्टनंट कर्नल (निवृत्त) प्रदीप ब्राह्मणकर यांच्याशीही संवाद साधला. याबाबत ब्राह्मणकर म्हणाले, ‘स्वाती महाडीक या सकारात्मक, जिद्दी, मेहनती, स्वयंप्रेरित, निश्‍चयी आणि उत्साही आहेत. त्यांच्यासोबत बोलताना सुरवातीला त्या वेळी त्या भूतकाळातील आठवणीत हरवल्या होत्या. त्यांना यातून बाहेर काढणे आवश्‍यक होते. मुलाखतीला जाण्यापूर्वी त्यांचा आत्मविश्‍वास आणि सामान्यज्ञान खूपच वाढले होते.‘‘
स्वाती महाडीक यांच्यात देशसेवा सातत्याने चालू ठेवण्याची जिद्द दिसल्याचे “ऍपेक्‍स करिअर्स‘च्या मानसशास्त्रज्ञ देवस्मिता सिन्हा यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *