सांगलीत रिक्षाचालकाचा पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न

घरगुती आणि पैशाच्या वादातून रिक्षाचालकाने आणि त्याच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या घेऊन आणि ब्लेडने नस कापून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार काल रात्री साडेदहा वाजता घडला. अमित शशिकांत कोष्टी (वय 32) व पत्नी रंजना ऊर्फ कांचन (वय 30, गणपती मंदिरजवळ, यशवंतनगर) अशी त्यांची नावे आहेत.

अमितचे वडील कर्नाटकात अथणी येथे राहतात. काही दिवसांपासून घरगुती कारणावरून त्याचा आणि नातेवाइकांचा वाद सुरू आहे. पैशावरूनही वाद वाढत गेला. त्यामुळे अमित आणि पत्नी रंजना हे दोघेही चिंतेत होते. रंजना आणि तिच्या नातेवाइकांचाही वाद होता. दोन्हीकडच्या वादामुळे अमित आणि रंजना यांना नैराश्‍य आले होते. गेले काही दिवस दोघेही सतत तणावाखाली होते.
काल रात्री दोघांनी नैराश्‍यातून जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली. तसेच घरातील दिवाणवर स्केचपेनने काहीजणांच्या नावाने मजकूर लिहिला. दोघांनी रात्री साडेदहाच्या सुमारास झोपेच्या गोळ्या खाल्या. त्यानंतर धारदार ब्लेडने दोघांनी हाताची नस कापून घेतली. काही वेळानंतर अमितने मित्राला मोबाइलवर कॉल करून हा प्रकार सांगितला. मित्राने त्याच्या वडिलांना हा प्रकार कळवला. त्यामुळे तत्काळ त्यांनी यशवंतनगर येथे धाव घेतली. जखमी दोघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला म्हणून सहायक फौजदार एस. बी. मगदूम यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *