तंबाखू, दारूचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक असते, हा इशारा गांभीर्याने घेण्याची गरजच नसल्याची भूमिका आता घेतली जात आहे. दारू, पान मसाला, सुपारीसारखे पदार्थ त्यावरील धोक्याच्या वैधानिक इशाऱ्यामुळे असुरक्षित मानण्याचे कारण नाही, असे अन्न सुरक्षा व दर्जा नियंत्रण प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) म्हणणे आहे.
सेफ्टी अॅण्ड स्टँडर्ड्स रेग्युलेशन २०१५ अंतर्गत तयार केलेल्या प्रस्तावात वैधानिक इशारा हा धोका नसल्याचे प्राधिकरणाने म्हटले असून, त्यावर लोकांची मते मागवली आहेत. मॅगीतील घटक व दर्जावरून झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर एफएसएसएआयन हा ‘सुरक्षे’चा नवा प्रस्ताव तयार केला आहे. दर्जावरून, वा पदार्थातील घटकांमुळे जिवाला धोका असण्याची भीती असल्यास संबंधित उत्पादन परत मागवण्याची कायदेशीर तरतूद असते. त्यादृष्टीनेच या इशाऱ्याबाबत पुनर्स्पष्टीकरण करण्यात येणार आहे. संबंधित उत्पादन परत मागवताना उत्पादित झालेला लॉट, बॅच किंवा कोडचा विचार केला जातो. माल परत घेण्याची जबाबदारी उत्पादकाची असते, असे एफएसएसएआयने म्हटले आहे.

