परदेशी पर्यटकांनी (महिलांनी) छोट्या गाव – शहरात स्कर्टस घालू नये , रात्रीच्या वेळेस एकटं बाहेर पडू नये असा अजब सल्ला दिल्याने केंद्रीय पर्यटन मंत्री महेश शर्मा अडचणीत सापडले आहेत. परदेशी पर्यटक जेव्हा भारतात येतात, तेव्हा विमानतळावर त्यांचे स्वागत करताना एक कीट दिला जातो, ज्यामध्ये एका पुस्तकात ‘ काय करावे व काय करू नये’ अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्येच परदेशी महिलांना असे काही सल्ले देण्यात आले असून आता त्यावरूनच महेश शर्मा यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
‘ परदेशी पर्यटकांनी भारतात आल्यावर काह गोष्टी पाळाव्यात. एअरपोर्टवरून निघताना ज्या टॅक्सीमध्ये बसाल, त्या टॅक्सीच्या नंबरप्लेटचा फोटो काढून, तो आपले मित्र वा नातेवाईकांना पाठवून ठेवावा. छोटी गावे वा शहरात रात्री-अपरात्री एकट्याने फिरू नये, (महिलांनी) स्कर्ट्स घालू नये’ अशा सूचना त्या किटमध्ये असल्याचे शर्मा यांनी सांगितले. मात्र पर्यटकांना पेहेरावावरून देण्यात आलेली ही सूचना सर्वांनाच रुचलेली नसून त्यांच्यावर टीका करण्यात येक आहे. त्यानंतर शर्मा यांनी सारवासारव करत, आपण कोणालाही कपड्यांवरून सल्ला दिलेला नसल्याचे स्पष्ट केले.