जुन्या वस्तू विक्रीत पुणेकर आघाडीवर

विनावापर पडून असलेल्या जुन्या वस्तूंची विक्री करण्यासाठी ऑनलाइन सुविधेचा   लोक मोठ्या प्रमाणात उपयोग करत असून, त्यात पुणेकर आघाडीवर असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे.

2015-16 या वर्षामध्ये येथे वापराविना पडून असलेल्या जुन्या वस्तूंची सर्वाधिक विक्री झाली असल्याचे आयएमआरबीने (इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो) केलेल्या ‘कन्झ्युमर रिसर्च ऑन युज्ड गुडस अँड सेलिंग ट्रेंडस’  (क्रस्ट) या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पुण्यासह पटणा, गुवाहाटी, लखनौ, अहमदाबाद, चंदीगढ आदी 16 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.
 या गोष्टी पुढे कधीतरी वापरात येतील या विचाराने वस्तू साठवून ठेवण्याकडे पुण्यातील लोकांचा कल असतो. वापराविना पडून असलेली पुस्तके आणि क्रीडासाहित्य जपून ठेवायला त्यांना आवडते, असे या सर्वेक्षणात आढळले आहे. येथे जितकी वापराविना पडून असलेली पुस्तके आणि क्रीडासाहित्य दिसेल तितके देशातील इतर कोणत्याही शहरात पाहायला मिळणार नाहीत, अशी टिप्पणी या अहवालात करण्यात आली आहे. तसेच या शहरातील लोकांना अजूनही मुलांची जुनी, वापराविना पडून असलेली खेळणी विकावीशी वाटत नाहीत. अशी खेळणी एकतर फेकून तरी देतात किंवा गरजूंना देतात. पुण्यातील लोक सतत काहीतरी नवे किंवा ट्रेण्डी वापरून पाहण्यास उत्सुक असतात, असेही या अहवालात म्हटले आहे.
याबाबत ओएलएक्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमरसिंग बत्रा म्हणाले, पूर्वी लोक जुन्या वस्तूंच्या विक्रीबाबत जागरूक नव्हते. आता जागाही लहान असते.त्यामुळे वस्तू साठवण्यावर मर्यादा येतात. थेट ग्राहकाशी संपर्क साधून वस्तू विकून पैसे घेता येतात. त्यामुळे सहज, सोपा व्यवहार करणे शक्य झाले असल्याने जुन्या वस्तू विकण्याचे प्रमाण वाढले आहे. नवीन वस्तू घेण्याचे प्रमाण आणि वारंवारताही वाढली आहे, त्याचाही परिणाम विक्री वाढीत झाला आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये बाहेरगावांमधून विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांचेे प्रमाणही अधिक आहे. ते बहुधा भाडेतत्त्वावर राहतात. त्यामुळे नवीन महागड्या वस्तू घेण्यापेक्षा सेकंडहँड वस्तू घेण्यावर त्यांचा भर असतो. स्वतःचे घर घेतल्यानंतर किंवा दुसरीकडे जाताना या वस्तू सहज विकल्या जातात. ऑनलाइन सुविधेमुळे घरात नुसत्याच पडून असलेल्या वस्तू विकण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. घरातील निव्वळ जागा व्यापणार्‍या वस्तू चांगला आर्थिक परतावाही देतात. त्यामुळे विकणे हा पुण्याचा स्थायीभाव बनत चाललेला आहे. तसेच नवीन, अधिक अपग्रेडेड वस्तू विकत घेण्याकरिता वापराविना पडून असलेल्या वस्तू विकण्याकडेही लोकांचा कल वाढत चाललेला आहे. बाहेरगावांमधून पुण्यामध्ये वास्तव्यास येणार्‍या लोकांना हा कल उपयुक्त व सोयीस्कर ठरत असल्याचे या अहवालात म्हटलेे आहे.
पुण्यात शिक्षण आणि त्यानंतर नोकरीनिमित्त दहा वर्षांपासून राहणारे विकास कौल म्हणाले, गेली दहा वर्षे मी पुण्यात भाडेतत्त्वावर दोन-तीन मित्रांसोबत राहात आहे. दर दोन-चार वर्षांनी घर बदलावे लागते. त्यामुळे आवश्यक असणारे बेड, कपाटे, टेबल, वॉटर फिल्टर अशा वस्तू आम्ही सेकंडहँड घेतल्या आहेत. एकतर त्या कमी खर्चात मिळतात आणि आता ऑनलाइन सहजपणे विकता येतात. अमेरिकेत पूर्वीपासूनच नको असलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘गराज सेल’ची संकल्पना अस्तित्वात आहे, ती भारतात ऑनलाइनच्या माध्यमामुळे वेगाने पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *