चाफळ : तंटामुक्ती अध्यक्षाचा बाजारात खून

चाफळ (ता. पाटण) येथील बसस्थानकावर चाफळ तंटामुक्ती अध्यक्ष विकास बबन साळुंखे (वय 42 ) यांच्यावर किरकोळ कारणावरुन एकाने बारा बोअरच्या बंदुकीने जवळून दोन गोळ्या झाडून त्यांचा खून केला. गुरुवारी आठवडा बाजार दिवशी संध्याकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान संतप्त जमावाने संशयिताच्या जीपची मोडतोड करून ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेने चाफळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गोळीबार करणारा संशयित चंद्रकांत महादेव भाईगडे (पिंट्या) (वय 45, रा.जाधववाडी, ता. पाटण) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटना स्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी चाफळ गावचा आठवडी बाजार होता. बाजाराच्या पावती वसुलीचा ठेका विकास साळुंखे यांच्याकडे आहे. ते नेहमीप्रमाणे  बाजाराच्या पावती वसुलीचे काम करून येथील बसस्थानकाजवळ लावलेल्या आपल्या दुचाकीवर बसले होते. त्यावेळी संशयित चंद्रकांत भाईगडे हा आपली वडापची जीप घेऊन बाजारातून जात होता. त्यावेळी साळुंखेंनी त्याला जीप बाजारातून घेऊन जाऊ नको असे सांगितले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर  चंद्रकांत घरी जाऊन बारा बोअरची बंदुकी घेऊन बाजारात आला. त्यावेळी अचानक पाठिमागून येऊन कोणाला काही समजण्याच्याआत विकास साळुंखे यांच्या पाठीवर त्याने साधारण पाच फुटाच्या अंतरावरून दोन गोळ्या झाडल्या. यामध्ये विकास साळुंखे गंभीर जखमी होऊन जागेवरच कोसळले.

बाजारचा दिवस असल्याने  ऐन गर्दीच्या वेळी गोळीबार झाल्याने घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. यावेळी संतप्त जमावाने संशयित चंद्रकांत भाईगडे याच्या हातातील बंदूक हिसकावून घेत त्याला बेदम चोप दिला. तसेच त्याच्या कंमाडर जीपची (एम.एच 23 ई.864 ) मोडतोड करुन ती पेटवून देण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जमावाला पांगवत भाईगडे याला ताब्यात घेतले. जखमी विकास साळुंखे यांना काही जणांनी तत्काळ कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, उपचार सुरु असताना  विकास साळुंखे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेने चाफळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत उंब्रज पोलिसात सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *