महापालिका शाळांत सूर्यनमस्कार बंधनकारक

मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांत प्रार्थनेच्या वेळी सूर्यनमस्कार व योगा बंधनकारक करण्यात आले आहे. बंधनकारक ऐवजी ते ऐच्छिक असावे, अशी काँग्रेस आणि सपाची मागणी असताना ही सूचना फेटाळून भाजपा-शिवसेनेने याबाबतची ठरावाची सूचनाच बहुमताच्या आधारे मंजूर करून हे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या प्रस्तावावर उघडपणे कोणतीही भूमिका न मांडणा-या शिवसेनेने ठरावाच्या बाजूने मतदान करून मूक भूमिका घेतली. त्यामुळे आता महापालिकेच्या सर्व शाळांत सर्वच जाती धर्माच्या मुलांना प्रार्थनेच्यावेळी सूर्यनमस्कार करावे लागणार आहेत.

पालिकेच्या सर्व शाळांत प्रार्थनेच्यावेळी सूर्यनमस्कार व योगा करणे बंधनकारक करण्याची मागणी भाजपा नगरसेविका समिता कांबळे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे मांडल्यानंतर विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा यांनी,‘२००५मध्ये अशाचप्रकारे काँग्रेस नगरसेविका ज्योत्स्ना दिघे यांनी मांडलेल्या सूचनेनुसार सभागृहात ठराव केला होता. त्याचा ठराव राज्य सरकारकडे प्रलंबित असल्याने एक ठराव प्रलंबित असताना दुसरा ठराव करणे योग्य नसून जर हा ठराव करायचा असेल तर प्रार्थनेच्यावेळी सूर्यनमस्कार व योगा बंधनकारक करण्याऐवजी ते ऐच्छिक करण्याची आपली उपसूचना राहील, असे छेडा यांनी स्पष्ट केले. यावर भाजपाचे माजी गटनेते दिलीप पटेल यांनी सूर्यनमस्कार व योगा यांना धर्मासोबत जोडणे योग्य नाही, असे स्पष्ट करत या उपसूचनेचा विरोध करत ते ऐच्छिक नसावे, असे स्पष्ट केले. सपाचे रईस शेख यांनी सूर्यनमस्कार व योगा हे ऐच्छिकच असावे, असे स्पष्ट करत प्रत्येक धर्माची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे अशाप्रकारे ठराव करून सभागृहात धर्म आणू नये. धर्माच्या नावावर हे राजकारण खेळले जात असून अशाप्रकारे जर दुस-या धर्माचे संस्कार लादले जाणार असेल तर आम्ही आमची मुले शाळांमधून काढू, असा इशारा दिला. पण, अशी वेळ येणार नाही. योगाद्वारे आमच्या मुलांच्या हृदयात शिरण्याचा प्रयत्न केला जात आहे. या माध्यमातून आमच्या घरात शिरण्याचा प्रयत्नही होत आहे. त्यामुळे जर ही सूचना मंजूर केली तर आम्ही ‘अस्लामवालेकूम’ अशाप्रकारची सूचना करू, असाही इशारा दिला. यावर भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालून रईस शेख यांच्या भाषणात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

मुलांची काळजी असल्यामुळे ही सूचना केली असल्याचे सांगत भाजपाच्या ज्योती अळवणी यांनी आसनांमध्ये जी नावे आहेत ती पंचमहापुतांच्या गोष्टीवर आधारित आहेत. या पंचमहाभूतांमध्ये धर्म नाही, असे सांगत सुर्यनमस्कार बंधनकारक करण्याची मागणी केली. मुलांच्या अधिकाराबाबत युनिसेफने बनवलेल्या नियमावलीचा आधार देत मनसेचे संदीप देशपांडे यांनी मुलांच्या हक्काचे संरक्षण केले जाईल, मुलांच्या मतांचा आदर करायला शिका असे यात नमूद केले. त्यामुळे मुलांच्या बुद्धीप्रमाणे निर्णय घेतले पाहिजे. मुलांवर काहीही लादणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे धनजंय पिसाळ यांनी सूर्यनमस्कार हा रिकाम्या पोटी केला जाणारा व्यायाम आहे. मग जी मुले शाळांमध्ये खाऊन येतात त्यानंतर सूर्यनमस्कार करायला लावून त्यांचे आरोग्य बिघडवण्याचा हा प्रकार असल्याची बाब लक्षात आणून दिली. यावेळी झालेल्या चर्चेत विनोद शेलारांसह तब्बल २५ हून अधिक सदस्यांनी भाग घेतला होता. मात्र शिवसेनेच्या एकाही सदस्याने यावर मत मांडले नाही. त्यामुळे अखेर प्रविण छेडा आणि रईस शेख या दोघांच्या उपसूचना फेटाळून मूळ सूचना शिवसेना-भाजपाने बहुमताच्या आधारे मंजूर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *