टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठय़ा व्यवहारांची चर्चा होत असून व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर या दोन मोबाईल कंपन्यानी विलीनीकरणाची बोलणी सुरू केल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. दोन्ही टेलिकॉम महाकंपन्या डावपेचात्मक कराराची शक्यता पडताळून पाहत असून हे प्रत्यक्षात आले तर बाजारातील हिश्शाच्या संदर्भात भारतातील ही सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असेल.
व्होडाफोनची प्राथमिक समभागविक्री ११ अब्ज डॉलर असून आयडियाचे भांडवल ५ अब्ज डॉलर असल्याचे मानले जाते. या दोन्ही कंपन्या एक झाल्या तर दोघांचे एकत्रित बाजार भांडवल होईल तब्बल १६ अब्ज डॉलर. तसेच आयडिया सेल्युलर अगोदरच सूचिबद्ध झाल्यामुळे व्होडाफोनला आयपीओ घेऊन येण्याचीही गरज नाही, असेही सांगण्यात येते. आयडियाचे मालक के. एम. बिर्ला यांनी काही दिवसांपूर्वीच असे म्हटले होते की, पुढील दोन वर्षे कंपनी व टेलिकॉम क्षेत्रासाठी आव्हानात्मक आहेत. आयडिया व व्होडाफोनने विलीनीकरणाची बोलणी यशस्वी झाल्यास त्याचा परिणाम काय होईल, याचा विचार प्रत्येक पैलुनुसार केला असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
संयुक्त कंपनीचा बाजारातील भांडवली हिस्सा ५० टक्क्यांवर राहणार असल्याने तिला अनेक क्लिष्ट नियामक मंजुरी मिळवाव्या लागतील. टाटा सव्र्हिसेससारख्या कंपनीशीही व्होडाफोनने यापूर्वी विलीनीकरणाबाबत बोलणी सुरू केली होती. व्होडाफोनने आयडियाशीही या अगोदर विलीनीकरणाबाबत बोलणी केली होती. मुकेश अंबानी यांची रिलायन्स जियो व इतर मोबाईल कंपन्या यांच्यात युद्ध सुरू असतानाच व्होडाफोन व आयडिया या कंपन्यांच्या संभाव्य विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.