सांगलीतली 42 गावं महाराष्ट्राला रामराम ठोकण्याच्या तयारीत

सांगलीतली 42 गावं महाराष्ट्राला रामराम ठोकण्याच्या तयारीत

सीमाभागातल्या गावांवर नेमका कुणी हक्क गाजवावा, यावरुन आजवर अनेक चर्चा रंगल्या आहेत,  अस्मितेच्या मुद्द्यावरुन राजकारणात दंग असणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मात्र सीमेवरच्या गावांना मुलभूत सुविधा पोहोचवल्याच नाहीत, त्यामुळे सांगलीच्या जत तालुक्यातील 42 गावं महाराष्ट्राला रामराम ठोकत कर्नाटकात जाण्याच्या तयारीत आहेत.

स्थलांतर करणासाठी या गावकऱ्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबरोबरच कर्नाटक राज्यालाही पत्र पाठवलं आहे. या स्थलांतराचं मुख्य कारण आहे म्हणजे या भागातील पाण्याचं दुर्भिक्ष्य. सांगलीतला सगळ्यात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. 120 गावांचा आणि 15 ते 20 वाड्यांनी बनलेल्या हा तालुका कर्नाटक सीमेपर्यंत विस्तारला आहे. मात्र, तालुक्यातल्या 42 गावांमध्ये एक वेळचं पाणी मिळण्याचीही आबाळ आहे.

जत पासून उमदी 55 किलोमीटर अंतरावर आहे. म्हैशाळ योजना ही जत पर्यत येवून थांबली आहे, मात्र पुढील 50 किलोमीटर अंतरावरील सर्व गावांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, उमदी गावापासून केवळ 10 किलोमीटरवर कर्नाटक राज्यातील गावे सुरु होतात, इथं मात्र कर्नाटक राज्याने मुबलक पाण्याची सोय केली आहे, मात्र महाराष्ट्र राज्य सरकार या गावांकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

42 गावांनी आता कर्नाटक राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता तरी महाराष्ट्र राज्य सरकारने या गावांच्या पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावं आणि या दुष्काळी भागाची तहान भागवावी अशी मागणी या परिसरातील 42 गावांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *