नाशिक ते पुणे दरम्यानच्या सी-प्लेन विमानसेवेस सोमवारपासून सुरूवात होत असून पावसाळी वातावरण असले तरी नियोजित वेळेवरच विमानाचे उड्डाण होईल, अशी माहिती मेहेर कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे.
ओझर विमानतळावरून सकाळी साडेअकरा वाजता सी प्लेन क्षेत्रातील मेरीटाईम एनर्जी हेल एअर सव्र्हिसेस (मेहेर) या कंपनीचे नऊ आसनी विमान पुण्याकडे झेपावणार आहे. पुण्याला हे विमान पोहचण्यास ५० मिनिटांचा वेळ लागणार आहे. सकाळनंतर दुपारी चार वाजता याप्रमाणे दिवसातून दोन वेळा ही सेवा सुरू राहणार असून पुण्याहून सकाळी ११ आणि सायंकाळी सहा या विमानाच्या वेळा आहेत. याआधी नाशिकहून मुंबईसाठी विमानसेवेचा प्रयोग झाला असून प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी तो काही दिवसानंतर फसला. नाशिकहून पुण्यासाठी विमानसेवेचा प्रयोग प्रथमच होत असून सी-प्लेनमध्ये केवळ नऊ आसनांची सुविधा असल्याने ही विमान सेवा यशस्वी होऊ शकेल, असे ट्रॅव्हल्स एजंटस असोसिएशन ऑफ नाशिकचे (तान) अध्यक्ष दत्ता भालेराव यांनी नमूद केले आहे.
पहिल्या दिवसाच्या सेवेची नोंदणी पूर्ण झाली असून प्रवाशांकडून गटाप्रमाणे नोंदणीसाठी विचारणा होत आहे. नाशिक-पुणे बस प्रवासासाठी साडेचार ते पाच तास लागत असून या विमान सेवेमुळे हा प्रवास केवळ पन्नास मिनिटात पूर्ण होणार असल्याने उद्योजक, व्यापारी यांच्याकडून या सेवेस प्रतिसाद मिळू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. या विमान प्रवासाचे एका बाजुचे भाडे १२ हजार रूपये असून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मेहेर कंपनीने नाशिक-पुणे परतीचे तिकीट काढणाऱ्यांना तीन हजार रूपयांची सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासाठी जाणाऱ्या पहिल्या विमानातून खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर उद्योजक अविनाश आव्हाड, सिम्बोयसीसचे सी. आर. पाटील, सायली फरांदे हे तिकीटधारक प्रवासी असतील, अशी माहिती भालेराव यांनी दिली आहे.

