गणपतीसाठी कोकणात जाणा-या गाडया ‘टोल फ्री’ करा

जागोजागी पडलेल्या खड्डयांमुळे मुंबई-गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. भाजपा-शिवसेना सरकारने घोषणा करूनही धोकादायक पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण आहे.

सरकारच्या चुकीमुळे कोकणवासीयांना मुंबई-पुणे महामार्गाद्वारे गणपतीला कोकणात जावे लागणार आहे. या मार्गावरून जाणा-या कोकणवासीयांकडून ‘टोल’ घेऊ नये, अशी मागणीही आम्ही केली आहे. पण सरकारकडून त्यावर काहीही उत्तर आलेले नाही.

सरकारच्या उत्तराची २५ ऑगस्टपर्यंत आम्ही वाट पाहू, असा इशारा कणकवलीचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी फडणवीस सरकारला दिला. तसेच गणपतीला जाणारी गाडी ओळखता यावी म्हणून कोकणवासीयांनी गाडीच्या काचेवर ‘कोकण’ पाटी लावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, गणपतीच्या काळात कोकणवासीयांना मुंबई-पुणे महामार्ग ‘टोल मुक्त’ करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिवसेना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १८ ऑगस्ट रोजी पत्राद्वारे केली. मात्र त्यांनी कोणताही निर्णय जाहीर केला नाही. यावरून त्यांना कोकणी माणसांप्रती किती तळमळ आहे, हे स्पष्ट होते, असा टोला त्यांनी शिवसेना-भाजपाला लगावला.

सरकारच्या निष्काळजीपणामुळे महाड येथे सावित्री नदीत पूल पडला. विधिमंडळात याबाबत जाब विचारल्यानंतर आश्वासन देऊनही सरकारने धोकादायक पुलांचे ऑडिट करण्यास सुरुवात केली नाही. ही जनतेची फसवणूक आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनात रात्री प्रवास करताना भीतीचे वातावरण आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डयांमधून प्रवास करणे कोकणवासीयांना त्रासाचे ठरणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे- कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्याचे कोकणवासीयांनी ठरवले आहे. तेव्हा सरकारने आपली नैतिक जबाबदारी समजून या मार्गावर जाणा-या वाहनांना टोल मुक्ती द्यायला हवी, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *