बिहारमध्ये अवैध दारूप्रकरणी २५ पोलीस निलंबित

बिहार येथील गोपालगंज येथे विषारी दारू प्यायल्याने १३ जणांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणी कर्तव्यात निष्काळजी करण्याच्या आरोपाखाली २५ पोलिसांना निलंबित करण्यात आले असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे राज्यात नितीश सरकारच्या संपूर्ण दारूबंदीच्या दाव्यावर संदिग्धता निर्माण झाली असून पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न निर्माण झाला आहे.

बिहारमध्ये नितीश सरकारने संपूर्ण राज्यात दारूबंदी पुकारली होती. मात्र विषारी दारू प्यायल्याने बुधवारी झालेल्या १३ जणांच्या मृत्यूने राज्य सरकारच्या या दाव्याला मोठा झटका लागल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी १४ जणांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून यातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीच्या आधारावर दोषी आढळल्याने पोलीस अधीक्षक रवी रंजन कुमार यांनी २५ पोलिसांना तात्काळ निलंबित केले आहे. या प्रकरणी पोलिसांवर कर्तव्यात निष्काळजी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

दारूबंदी कायद्यानुसार पोलिसांनी योग्य वेळी चौकशी करणे आवश्यक होते, तसेच संशयास्पद गोष्ट आढळल्यावर छापे मारणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे न केल्याने अवैध दारूनिर्मितीचे काम सर्रास सुरू राहिले, असे कुमार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *