कोकण-पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार; जयगड-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी NHAIकडून हालचाली सुरू

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अंतर कमी करण्यासाठी आता एका नव्या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जयगड बंदर-चिपळूण-सातारा द्रुतगती महामार्गासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ( NHAI ) हा मार्ग उभारणार आहे. यामुळे कोकणातील किनारी मार्गावरील प्रदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हीटी सुधारणार आहे.

एका तासांत प्रवास होणार

NHAIने या प्रकल्पावर काम सुरू केलं आहे. मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी आणि प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. या निविदा १८ ऑगस्ट रोजी उघडल्या जातील. या प्रकल्प अहवालानंतर मार्गाला मंजुरी मिळून काम सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ९,६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. जयगड बंदर ते सातारादरम्यान प्रवासाचा वेळ पाच तासांवरून केवळ एका तासावर येण्याची शक्यता आहे. या नव्या मार्गामुळे दैनंदिन प्रवासासह अवजड औद्योगिक वाहतुकीसाठी एक पर्याय उपलब्ध होणार आहे.

कोकण किनारपट्टीवरील बंदरे आणि अंतर्गत व्यापार केंद्रांमध्ये थेट संपर्क सुधारण्यासाठी हा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येत आहे. या महामार्गासाठी पश्चिम घाटात बोगदे आणि उन्नत पूल बांधून मार्ग तयार करण्यात येणार आहेत. सध्या राज्यातून जयगड बंदरापर्यंत जाणाऱ्या औद्योगिक वाहनांना नागरी मार्ग, घाटातील धोकादायक वळणांवरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. पण या मार्गामुळे थेट प्रवास शक्य होणार आहे. हा पूर्णपणे ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्ग असेल.

कुठून-कुठे जोडणार?

हा महामार्ग तब्बल ९८ किमी लांब असेल. राष्ट्रीय महामार्गा ४८ही या महामार्गाशी जोडण्याची नियोजन आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, चाकण, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजक सहजपणे कोकणात प्रवास करू शकतात. यामुळे कोकण आणि सह्याद्री परिसरातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. घाटातून माल नेताना वाहनचालकांना सावध होऊन प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात घाटात दरडी कोसळण्याची भीती मोठी असते. पण नव्या मार्गामुळे प्रवासाचा अधिक सुरक्षित मार्ग मिळणार होणार आहे.

जयगड-सातारा द्रुतगती महामार्गाला प्रस्तावित पुणे-बंगळुरू द्रुतगती महामार्ग आणि पुणे-बंगळुरू महामार्गाशी जोडण्याचीही योजना आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावर लॉजिस्टिक पार्क वेअरहाउसिंग आणि औद्योगिक गुंतवणुकीसाठी नवीन संधी उपलब्ध होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना जयगड बंदरांशी थेट जोडल्यामुळे उद्योगांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्यासाठी एक पर्यायी मार्ग मिळू शकतो. पुणे महानगर प्रदेशासाठीही हा प्रकल्प महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *