ब्रिटनमध्ये १०३ वर्षांचा नवरा आणि ९१ वर्षांची नवरी शनिवारी विवाहबद्ध झाले असून, ते जगातील सर्वांत वयोवृद्ध नवविवाहित दाम्पत्य ठरले आहे. जॉर्ज किर्बी व डोरीन लुकी अशी पती-पत्नीची नावे आहेत. लग्नानंतर पतीला पत्नीने व्हीलचेअरवरून नेले. दोघांचे वय एकत्र केल्यास ते १९४ वर्षे होते.
जॉर्ज किर्बी यांचा १३ जूनला १०३वा वाढदिवस होता. त्यानिमित्त इस्टबर्न येथील एका हॉटेलमध्ये या दोघांनी विवाह केला. या समारंभास कुटुंबातील सदस्य व मित्र असे ५० जण उपस्थित होते. गिनीज बुक आॅफ रेकॉर्डस्चा प्रतिनिधी विवाहाचा साक्षीदार म्हणून उपस्थित होता.
७ मुले, १५ नातवंडे
गेल्या २७ वर्षांपासून हे दोघे एकत्र राहत होते. माजी बॉक्सर असणाऱ्या किर्बी यांनी व्हॅलेंटाईन डेला आपल्या दीर्घकाळच्या मैत्रिणीला विवाहासाठी विचारले होते. या दाम्पत्याला ७ मुले, १५ नातवंडे व ७ परतवंडे आहेत. आपण लवकर विवाह केला नाही, याबद्दल आम्हाला काही खेद वाटत नाही. कारण तेव्हा आम्हाला लग्नाचे महत्त्व कळत नव्हते, आता लग्न करावेसे वाटले म्हणून विवाहबंधनात अडकलो असे किर्बी यांनी सांगितले. डोरीनच्या सहवासात मी आजही तरुण आहे, असेही त्यांनी सांगितले.

