नवजात बालक दिसते वृद्धासारखे

नवजात बालक दिसते वृद्धासारखे

नुकतेच जन्मलेल्या बाळाचे गोंडस रूप पाहण्यासाठी सर्वानाच उत्सुकता असते. परंतु डहाणू तालुक्यातील चळणी गावात जन्मलेले बाळ मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.

काही दिवसांपूर्वीच जन्माला आलेले हे बाळ एखाद्या वृद्धासारखे दिसत आहे. त्याच्या त्वचेवर सुरकुत्या असून डोके मोठे आहे. आपल्या बाळाचे असे रूप पाहून आईने त्याला स्वीकारण्यास नकार दिला असतानाच बाळाच्या आजी-आजोबांनी मात्र त्याची जबाबदारी घेतली आहे. बाळाचे आजोबा शनिवारी त्याला मुंबईतील वाडिया रुग्णालयात घेऊन आले.

बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला कोणता आजार झाला आहे, हे तपासणीद्वारे स्पष्ट होईल. मात्र उपचाराचा खर्च बाळाच्या आजोबांना परवडण्यासारखा नसल्याने, बाळाच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी वाडिया रुग्णालयाने दर्शवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने सातव्या महिन्यात या बाळाला जन्म दिला. प्रसूतीपूर्व जन्माला आलेले हे बाळ अन्य बाळांप्रमाणे न दिसता वृद्धासारखे दिसत होते. दरम्यान, हे बाळ कोणत्या तरी आजाराने त्रस्त असल्याचे स्पष्ट होत आहे.

त्याचा जन्म होऊन आता १४ दिवस झाले असताना बाळाचे वजन केवळ ८०० ग्रॅम असून उंची अर्धा फूट इतकी आहे. बाळाच्या काहीशा वेगळ्या शरीररचनेमुळे बाळाची आई त्याला जवळ घेण्यासही तयार नाही. मात्र त्याचे पालनपोषण करण्याची जबाबदारी आजी-आजोबांनी आनंदाने स्वीकारली आहे.

हे बाळ कुपोषित आहे का किंवा त्याला कोणता वेगळा आजार झाला आहे का, हे स्पष्ट होण्यासाठी तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे आजोबांनी त्याला वाडिया रुग्णालयात दाखल केले.

या बाळाला एनआयसीयूत दाखल करण्यात आले आहे. रविवारी बाळाच्या रक्ताची तपासणी करण्यात आली असून त्याला रक्तसंसर्ग झाल्याचे वैद्यकीय अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. दरम्यान सोमवारी बाळाच्या डोक्याची आणि पोटाचीही तपासणी करण्यात येणार आहे.

या सर्व तपासणींना साधारणत: दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे वैद्यकीय तपासणीचे सर्व अहवाल प्राप्त झाल्यानंतर बाळाला नक्की कोणता आजार झाला आहे हे कळेल, अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *