तीन काळविटांची शिकार

तालुक्‍यातील तलमोड शिवारात तीन काळविटांची शिकार करून त्यांचे अवयव व मांसाची विक्री करणाऱ्या शिकाऱ्यांच्या टोळीचा बेत वनविभागाच्या पथकाने हाणून पाडला. सोमवारी (ता.15) स्वातंत्र्य दिनाच्या सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला.

तलमोड शिवारातील मांगनखोरी भागात तीन काळविटांची शिकार केल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी विजयकुमार दौंड, मुळज बीटचे वनरक्षक टी. ए. डिघोळे, के.व्ही. मगर, वनपरिमंडळ अधिकारी एल. एन. बंडगर यांच्या पथकाने घटनास्थळी सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास छापा टाकला. वनविभागाच्या पथकाने शिकाऱ्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चौघे चपळाईने निसटले तर बलभीम विठोबा मुळगे (वय 56 वर्षे रा. मुळगेवाडी, ता.बसवकल्याण जि. बिदर) याला पकडण्यात आले. काळविटांचे धडावेगळे केलेले तीन मुंडके, धारधार कोयते व इतर अवयव वनपथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून मंगळवारी (ता.16) बलभीम मुळगे याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत (ता.18) वनकोठडी सुनावली आहे. कत्तल केलेले काळविटांचे अवयव रात्री उशिरा नष्ट करण्यात आले असून या गुन्ह्यात सात वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. वन्यजीव संरक्षक तथा सहायक वनसंरक्षक अधिकारी जी.एस. साबळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, फरारी झालेल्या चार आरोपींची नावे निष्पन्न झाली असून ते मुळगेवाडीचे रहिवासी आहेत, त्यांना अटक करण्यासाठी वनविभागाचे पथक मंगळवारी रात्री रवाना झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *