७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सकाळपासूनच ध्वजारोहण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह काही कमी नाही. ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु म्हणजेच सर्वांची लाडकी ‘आर्ची’ मुंबईतील भांडूप येथे ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहीली होती. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात रिंकू राजगुरुच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला.
दरम्यान, रिंकूची प्रमुख उपस्थिती असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार शिशिर शिंदेसुद्धा उपस्थित होते. ‘सैराट’ चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मिळालेली लोकप्रियता पाहता यंदाच्या ध्वजारोहणाचा मान रिंकू राजगुरुला देण्यात आला होता. या चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अनेक कारणांनी चित्रपटातील कलाकार सतत चर्चेत होतेच. आता त्यात आणखी एका चर्चेची भर पडली आहे. ती म्हणजे ‘सैराट’ मधील कलाकारांच्या मेणाच्या पुतळ्याची. लोकांच्या मनावर राज्य करणा-या ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ यांचा मेणाचा पुतळा आता लोणावळा येथील ‘सुनिल सेलिब्रेटी वॅक्स म्युझियम’मध्ये उभारण्यात येणार आहे. त्याचसोबत दिग्दर्शक नागराज मुंजळे यांचाही मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी नागराज मंजुळे, रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम हाती घेतले आहे.
भांडूपमध्ये ‘आर्ची’च्या हस्ते ध्वजारोहण..
