समभागाची मात्र ७ टक्क्य़ांनी मुसंडी ; बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेला तोटा
वाढीव बुडीत कर्जे व त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद याचा मोठा फटका देशातील सर्वात मोठय़ा स्टेट बँकेला बसला आहे. चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत बँकेला त्यापोटी नफ्यातील ७७.८० टक्के घसरणीला सामोरे जावे लागले आहे.
बँकेला वर्षभरापूर्वीच्या ४,७१४ कोटी रुपयांच्या नफ्याच्या तुलनेत एप्रिल ते जून २०१६ दरम्यान १,०४६ कोटी रुपये निव्वळ नफा झाला आहे. तर एकूण उत्पन्न मात्र वाढून ६९,४१५ कोटी रुपये झाले आहे.
एकूण वितरित कर्जापैकी ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण गेल्या तिमाहीत ६.४९ टक्क्यांवर गेले आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीदरम्यान ते ४.२९ टक्के होते. तर निव्वळ अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण वर्षभरापूर्वीच्या २.२४ टक्क्यांवरून यंदाच्या तिमाहीत ४.०५ टक्क्यांवर गेले आहे. वाढत्या अनुत्पादित कर्जापोटी (एनपीए) बँकेला ताळेबंदात कराव्या लागलेल्या आर्थिक तरतुदीचे प्रमाण वाढले असून ते तिमाहीत विस्तारताना ६,३४० कोटी रुपये झाले असल्याची माहिती बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी शुक्रवारी मुंबईत दिली.
बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँकेला तोटा
मुंबई : वाढत्या बुडीत कर्जापोटी करावी लागणारी आर्थिक तरतूद दुपटीने वाढल्याने सार्वजनिक क्षेत्रातील सेंट्रल बँकेला एप्रिल ते जून २०१६ तिमाहीत ५९९.८० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. बँकेने वर्षभरापूर्वी याच कालावधीत २०३.६० कोटी रुपयांचा नफा कमाविला होता. यंदा मात्र बँकेचे उत्पन्नही घसरून ६,६६२.६० कोटी रुपये झाले आहे. अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ८.१७ टक्क्यांपर्यंत गेलेल्या सेंट्रल बँकेची यासाठीची तरतूद दुप्पट वाढून १,५४३.६५ कोटी रुपये झाली आहे.
याच क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला ७४१.३० कोटी रुपयांचा तोटा चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत झाला आहे. वर्षभरापूर्वी बँकेला १२९.७० कोटी रुपयांचा नफा झाला होता. बँकेचे एकूण उत्पन्न यंदा घसरून १०,६६४.३० कोटी रुपये झाले आहे. अनुत्पादित मालमत्ता प्रमाण ७.७८ टक्क्यांवर गेलेल्या बँकेची यासाठीची आर्थिक तरतूद दुपटीने वाढून २७७ कोटी रुपये झाली आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सची आर्थिक कामगिरीदेखील फारशी आशादायक नाही. बँकेच्या नफ्यात ६०.९० टक्के घसरण होत गेल्या तिमाहीतील नफ्याची रक्कम १००.६९ कोटी रुपये राहिली आहे. वर्षभरापूर्वी ती दुपटीपेक्षा अधिक होती. बँकेचे एकूण उत्पन्न वाढले असले तरी बुडीत कर्जापोटी करावी लागणारी आर्थिक तरतूद ७५०.४० कोटी रुपयांपर्यंत गेली आहे.
शुक्रवारी भांडवली बाजारात ‘सेन्सेक्स’मध्ये स्टेट बँकेचा समभाग सर्वाधिक ७.१६ टक्के वाढीसह (बंद भाव रु. २४३.२०) आघाडीवर राहिला. एप्रिल ते जून या तिमाहीत निव्वळ नफ्यातील तब्बल ७७.८० टक्के घसरण नोंदवूनही समभागाची कामगिरी मूल्यवाढीची ठरली.