मूळचे परळी खोऱ्यातील अंबवडे येथील संगीत विशारद सचिन मोरे यांनी शास्त्रीय संगीत क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविले. त्यांनी विरार (मुंबई) येथे यंग स्टार संस्थेतर्फे जागतिक संगीत दिनानिमित्त आयोजित सलग ४३ तासांच्या शास्त्रीय संगीत मैफलीत गायन सादर केले. या उपक्रमाची गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून, त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या मैफलीत राज्यातील ३६ कलाकार सहभागी झाले होते.
मोरे यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए. (संगीत) शिक्षण घेतले आहे. ते संगीत विशारद असून, वांद्रे येथील शारदा संगीत विद्यालयात संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विविध संगीत गुरूंकडे त्यांनी शिक्षण घेतले. सध्या गोस्वामी कुंवरश्याम घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित मुरली मनोहर शुक्ल यांच्याकडे गायनाचे धडे घेत आहेत. गेली दहा वर्षे पंडित भवदीप जयपूरवाले यांच्याकडे संगीताचे धडे गिरवले आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या युवा महोत्सवात संगीत सादर केले आहे. त्यांनी शास्त्रीय संगीताच्या विविध राज्य स्पर्धेत पारितोषिके व शिष्यवृत्त्या मिळविल्या आहेत. त्यांच्या देशभरात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत मैफली होतात. ‘सारेगमप’मध्ये परीक्षक म्हणून, तर मराठी मालिकांमध्येही पार्श्वगायन केले आहे. लहानपणी वडील नामदेव यांच्याकडून संगीताचे बाळकडू घेतलेल्या मोरे यांना संगीताची राष्ट्रीय शिष्यवृत्तीही मिळाली आहे. गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या वतीने सन्मानपत्र देऊन त्यांचा नुकताच विरारमध्ये (मुंबई) गौरव करण्यात आला.
आयुष्यात मिळालेल्या या यशामुळे आनंदित आहे. पण, आई-वडील व गुरूंच्या मार्गदर्शनाखाली संगीताची साधना करण्याचा जास्त आनंद आहे. त्यांच्याच आशीर्वादाने उत्तरोत्तर प्रगती करत राहणार आहे.