शहरातील सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी पीएमपीच्या ताफ्यात 1550 बस उपलब्ध करण्याचा निर्णय अखेर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने बुधवारी घेतला. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. त्यामुळे 2009 पासून रखडलेल्या बस खरेदीला आता मुहूर्त मिळाला असून, येत्या तीन-चार महिन्यांत त्या टप्प्याटप्प्याने दाखल होतील.
अशा उपलब्ध होणार बस
अल्प व्याजदराने उपलब्ध होणाऱ्या वित्तपुरवठ्यातून 900 बस पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहकार्याने पीएमपीमार्फत खरेदी करणार आहे. केंद्र सरकारच्या अंगीकृत “एसएसआरटीयू‘ या संस्थेकडून 550 बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. 100 बस पुणे महापालिका अर्थसंकल्पातील तरतुदीतून खरेदी करणार आहे. वित्तपुरवठ्याद्वारे बस खरेदीसाठी आणि संचालनातील तुटीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका सहकार्य करतील, असेही बस खरेदीच्या ठरावात म्हटले आहे.
1550 पैकी भाडेतत्त्वावरील बस दीड महिन्यात टप्प्याटप्याने येण्यास प्रारंभ होऊ शकतो. दरम्यानच्या काळात बस खरेदीसाठी जागतिक निविदा मागविल्या जातील. अल्प व्याजदराच्या वित्तपुरवठ्यातून त्यासाठी निधी उपलब्ध केला जाईल. या प्रक्रियेला तीन-चार महिने लागतील. त्यानंतर कार्यादेश दिल्यावर ऑक्टोबरपासून बस येण्यास प्रारंभ होईल. मात्र, मंजुरीचे सोपस्कार पूर्ण झाल्यामुळे आता प्रशासकीय प्रक्रिया किती वेगाने गतिमान होईल, यावर बस उपलब्ध होण्याचे वेळापत्रक अवलंबून असेल.
