हॉकर्स प्लाझा की दुर्गंधी प्लाझा

दादर पश्चिम येथील हॉकर्स प्लाझामधील गाळेधारकांना सध्या नाक मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. महापालिकेने हॉर्कसना प्लाझामध्ये नेऊन टाकले. परंतु आता या हॉकर्स प्लाझाकडे लक्ष देण्यास महापालिकेच्या उपायुक्तांसह सहायक आयुक्त आणि अधिका-यांनाही वेळ नाही. हॉकर्स प्लाझामधील सांडपाण्याची वाहिनी फुटून सर्व पाणी व मल यामुळे प्लाझामध्ये दुर्गंधी पसरलेली आहे. परंतु या सांडपाण्याच्या वाहिन्या दुरुस्त करण्यास महापालिकेच्या अधिका-यांना वेळ नाही. स्थानिक नगरसेवकाने केलेला पत्रव्यवहार आणि पाठपुराव्यालाही अधिकारी जुमानत नसल्यामुळे येथील विक्रेत्यांना दुर्गंधीमुळे आजारी पाडून मारण्याचे षडयंत्र रचले का, असा संतप्त सवाल केला जात आहे.

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला असलेल्या जनता मार्केटमधील गाळेधारकांना तिथून हटवून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महापालिका जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या मागील बाजूस आणि क्रांतिसिंह नाना पाटील मंडईच्या शेजारी जागेत हॉकर्स प्लाझा बांधण्यात आले; परंतु या हॉकर्स प्लाझाच्या देखभालीकडे सध्या महापालिका बाजार विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हॉकर्स प्लाझामधील जनता मार्केटमधील सांडपाणी पाईप फुटून गळती होत आहे. या सांडपाण्यामुळे गाळेधारकांना व्यवसाय करताना तसेच इथे येणा-या ग्राहकांना मोठय़ा संकटांना सामोरे जावे लागते. एवढेच नव्हे तर या तुटक्या-फुटक्या सांडपाण्याचा निचरा करण्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भाजीपाला विक्रेत्यांची वाहने भिंतीलगत उभी करतात आणि तेथील भिंतीवरच लघुशंका करतात. त्यामुळेही दुर्गंधीचे साम्राज्य या हॉकर्स प्लाझामध्ये पसरले आहे. याबाबत स्थानिक मनसे नगरसेवक मनीष चव्हाण यांनी उपायुक्त (विशेष)प्रकाश पाटील आणि बाजार विभागाचे सहायक आयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही गाळेधारकांच्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही. याबाबत खुद्द मनीष चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या सांडपाणी वाहिन्यांबरोबरच शौचालयांच्या मलवाहिन्याही खराब होऊन तुंबल्या जात आहेत. तसेच अनेक ठिकणी या वाहिन्या तुटल्यामुळे त्यातील मल बाहेर येऊन अधिकच दुर्गंधी पसरत आहे. निदान लोकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तरी याकडे प्रशासनाने लक्ष देऊन याची दुरुस्ती करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.

तोडलेल्या गाळ्यांचे डेब्रिज तिथेच

हॉकर्स प्लाझा ही इमारत पाच मजली असून यातील दोन मजल्यांवर बनवण्यात आलेले छोटय़ा आकाराचे ओटे तोडून त्या जागा मोकळ्या करण्यात आल्या आहेत. परंतु ओटय़ांचे बांधकाम तोडण्यात आल्यानंतर त्यांचे डेब्रिज हॉकर्स प्लाझाच्या समोरच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आले आहे. मुळात ज्या गाळेधारकांसाठी हे ओटे तोडून ते गाळे मोकळे करून दिले जात आहेत. त्यांच्याकडून डेब्रिज उचलण्याचेही शुल्क गाळेधारकांकडून घेण्यात आले आहे. परंतु शुल्क घेऊनही डेब्रिज तिथेच टाकण्यात आले आहे. परिणामी यामुळे या परिसरात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे मनीष चव्हाण यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *