दत्तू भोकनळ ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून बाहेर

भारताचा रोईंगपटू दत्तू बबन भोकनळही ऑलिंपिक पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. पुरुषांच्या एकेरी स्कल प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी त्याला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. निर्धारित २ हजार मीटर अंतर पार करण्यासाठी दत्तूला ६:५९:८९ सेकंद लागले.

तिस-या स्थानी राहिलेल्या पोलंडच्या नॅटन वेगर्झीकी-झीमझीक (६:५३.५२ सेकंद) आणि दत्तूमध्ये सहा सेकंदाचा फरक आहे. उपांत्यपूर्व फेरीतील पहिले तीन रोईंगपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतात. दत्तूने चांगली सुरुवात करताना पहिल्या ५०० मीटर अंतरामध्ये दुसरे स्थान राखले.

मात्र त्यानंतर त्याला सातत्य राखता आलेले नाही. पात्रता फेरीत ७:२१.६७ सेकंद अशी वेळ देणा-या दत्तूने ‘क्वार्टरफायनल’मध्ये वेळ सुधारली तरी थोडक्यात त्याची ‘सेमीफायनल’ हुकली.

दत्तू भोकनळ हा भारताचा एकमेव रोईंगपटू रिओ ऑलिंपिकमध्ये सहभागी झाला होता. एकेरी स्कल प्रकारातील उपांत्यपूर्व फेरीतील चौथ्या गटात क्रोएशियाचा डॅमिर मार्टिन (६:४४.४४ सेकंद) आणि ग्रेट ब्रिटनचा अलॅन कँपबेल (६:४९४१ सेकंद) अनुक्रमे पहिला आणि दुसरा आला.

दत्तूची आई आशा आजारी आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दत्तूचा भाऊ त्यांची काळजी घेत आहे. आई आजारी असूनही दत्तूने आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *